‘लक्ष्मी निवास’ ही मालिका ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. कलाकारांची मोठी फौज असलेली ही मालिका २३ डिसेंबर २०२४ मध्ये सुरू झाली. दररोज टेलिव्हिजनवर एक तास प्रसारित होणारी ही पहिलीच मराठी मालिका असल्याचं म्हटलं जातं. त्यामध्ये एकावेळी तीन-चार कुटुंबीयांची कथा दाखवली जात आहे. तर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लक्ष्मी व श्रीनिवास यांची धाकटी मुलगी जान्हवीचा विश्वा नावाचा एक मित्र असतो. मालिकेत विश्वाची भूमिका अभिनेता अनुज प्रभू साकारत आहे.

अनुज या मालिकेत विश्वा ही सकारात्मक भूमिका साकारत आहे. विश्वा व जानू महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणी असल्याचं दाखविण्यात आलं आहे. विश्वाचं जान्हवीवर एकतर्फी प्रेम असतं; परंतु नंतर जान्हवीचं जयंतबरोबर लग्न होतं. त्यानंतर जान्हवीच्या प्रेमात बुडालेला विश्वा व्यसनाधीन होतो आणि अनेकदा स्वत:ला त्रास करून घेतो. परंतु, ही झाली विश्वाची ऑनस्क्रीन लव्हस्टोरी. तुम्ही विश्वाच्या खऱ्या आयुष्यातील जान्हवीला म्हणजे अभिनेता अनुज प्रभूच्या बायकोला पाहिलं आहे का?

अनुज प्रभू मुळचा गोव्याचा असून, तो खऱ्या आयुष्यात विवाहित आहे. अनुजच्या बायकोचं नाव तन्वी सामंत आहे. अनुज व तन्वी यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मार्च २०२१ साली अनुज व तन्वी यांनी लग्न केले होते. अनुजची पत्नी तन्वी अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. अनुज अनेकदा त्याच्या बायकोबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असतो. अनुजने ‘अल्ट्रा मराठी बझ’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या बायकोविषयी सांगितले आहे. तो म्हणाला, “माझी बायको माझी पहिली टीकाकार आहे. तिला माझं काम फार आवडत नाही. त्यामुळे तिला जेव्हा मी साकारलेली एखादी भूमिका आवडली असेल, तर ती तसं सांगते आणि माझं काम आवडलं नसेल, तर तेही सांगते.”

दरम्यान, अनुजच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने आजवर ‘जिंदगी विराट’, ‘धर्मवीर’, ‘कुण्या राजाची गं तू रानी’, ‘जिंदगी नॉट आउट’ यांसारख्या चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. अनुज खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला ते ‘धर्मवीर’ चित्रपटात त्यानं साकारलेल्या राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे. सध्या अनुज ‘झी मराठी’वरील ‘लक्ष्मी निवास’मध्ये विश्वा ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री दिव्या पुगावकर, अभिनेता मेघन जाधव, हर्षदा खानविलकर, अक्षया देवधर, कुणाल शुक्ला हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत पाहायला मिळत आहेत. तर या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.