Maharashtrachi Hasya Jatra Fame Nikhil Bane Buys New Bike : अलीकडच्या काळातील सगळेच कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करतात. काहीजण सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देतात. तर, काही कलाकार नवीन घर, गाड्या खरेदी केल्याचा आनंद आपल्या चाहत्यांसह साजरा करतात.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय झालेल्या निखिल बनेच्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्याच्या आयुष्यात फायनली ‘ती’ची एन्ट्री झालेली आहे. आता निखिलच्या आयुष्यातील ‘ती’ नेमकी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण, अभिनेत्याच्या आयुष्यात आलेली ‘ती’ दुसरी- तिसरी कोणीही नसून त्याची नवीकोरी ड्रीम बाईक आहे.
आवडती बाईक घ्यायची असं निखिलचं गेल्या अनेक दिवसांपासून स्वप्न होतं. अखेर अभिनेत्याचं हे स्वप्न साकार झालं आहे. निखिलने Triumph Scrambler XC 400 ही त्याची ड्रीम बाईक खरेदी केली आहे. नव्या बाईकसह हटके फोटोशूट करत त्याने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.
बाईक खरेदी करताना निखिलसह त्याचे कुटुंबीय व मित्रमंडळी उपस्थित होते. ही आनंदाची बातमी शेअर करताच अभिनेत्याच्या पोस्टवर मराठी कलाकार व त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. प्रथमेश शिवलकर, सौरभ चौघुले, नम्रता संभेराव या कलाकारांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
निखिलने घेतलेल्या या बाईकची किंमत २.९४ ते ३.६८ लाख ( एक्स शोरूम ) इतकी आहे. शहरांनुसार आणि व्हेरिएंटनुसार या किंमतीत बदल होऊ शकतो असं वृत्त द फायनान्शियल एक्सप्रेसने दिलं आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे निखिल बनेला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. निखिल सोशल मीडियावर सद्धा कायम सक्रिय असतो. तो अलीकडेच गणपतीनिमित्त चिपळूणला त्याच्या गावी गेली होता. यावेळी त्याने शेअर केलेल्या कोकणातील गणेशोत्सवाच्या व्हिडीओला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सध्या नवीन गाडी खरेदी केल्यामुळे निखिलचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.