Prasad Khandekar Buys New Car : दिवाळीच्या मुहूर्तावर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी नव्या घरात गृहप्रवेश केलाय, बहुतांश सेलिब्रिटींनी आपल्या मित्रमंडळींना सुंदर गिफ्ट्स पाठवलेत. तर काही कलाकारांच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे. ‘महाष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्याने देखील दिवाळीनिमित्त खास पोस्ट शेअर करत त्याच्या सगळ्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

प्रसाद खांडेकर वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता म्हणून ओळखला जाणारा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद खांडेकरने नुकतीच नवीन गाडी घेतली आहे. या नव्या गाडीची खास झलक अभिनेत्याने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

प्रसाद म्हणतो, “फायनली टाटा सफारी आयुष्यात आली…कॉलेजपासून ड्रीम कार होती माझी…मित्रांच्या ड्रीम कार वेगळ्या होत्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू पण माझी ठरलेली टाटा सफारी…त्या काळात सगळे सेलिब्रिटी राजकारणी व्हीआयपी टाटा सफारी किंवा टाटा सियारामधून फिरायचे. सफारी रोडवरून जाताना तिचा एक वेगळाच ऑरा असायचा…गाडी घेतल्यावर तो ऑरा फील करतोय… आई, अल्पा, श्लोक आणि मी आम्ही सगळेच भारी खूश आहोत”

प्रसाद आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह गाडी खरेदी करायला गेला होता. “आमच्या घरची नवीन सदस्य टाटा सफारी” असं कॅप्शन प्रसादने या पोस्टला दिलं आहे. नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी प्रसादच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

स्वप्नील जोशी, प्रभाकर मोरे, किरण गायकवाड, नम्रता संभेराव यांनी कमेंट्स करत प्रसाद व त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांचं अभिनंदन केलं आहे. प्रसादच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याशिवाय तो अलीकडेच ‘गाडी नंबर १७६०’ आणि ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या सिनेमात झळकला होता.