कलाकार मंडळींसाठी स्वतःचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळे कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आगामी कामासंदर्भात चाहत्यांना माहिती देत असतात. तसंच वैयक्तिक आयुष्यातील आनंदाच्या, दुःखाच्या गोष्टीदेखील चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. एवढंच नव्हेतर आजूबाजूच्या घडामोडींवर परखड भाष्य करत असतात. त्यामुळे कलाकार खूप चर्चेत असतात. पण, याच सोशल मीडियावरील अश्लील कंटेंटवरून मराठी अभिनेता भडकला आणि त्याने आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकरने सोशल मीडियावरील अश्लील कंटेंटवरून खास पोस्ट लिहिली आहे. तसंच सोशल मीडियावर बंधन घालणं अत्यंत गरजेचं असल्याचं अक्षय केळकर म्हणाला. सध्या अक्षय केळकरच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षय नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…

अक्षय केळकरने पोस्ट करत लिहिलं, “आपण सोशल मीडियावर बंधन घालणं अत्यंत गरजेचं आहे. दर दोन ते तीन रीलनंतर एक सॉफ्ट पॉर्न असल्यासारखं रील पॉप अप होतं…अख्ख्या जगासमोर कपडे बदलणं, क्लिव्हेज दाखवणं…किंवा मुला-मुलींकडून कंटेंट या नावाखाली काहीही विचित्र चाळे आणि फॉलोअर्ससाठीची विकृत मेहनत यात असते.”

पुढे अक्षयने लिहिलं, “सतत उत्तेजित व्हा हे सांगणार सोशल मीडिया झालाय. खरंतर सोशल मीडिया आजच्या काळात महत्त्वाचं माध्यम आहे. पण तरीही खूप घातक ठरतोय…सिनेमा पुरता अडल्टचा टॅग लावायचा आणि या मीडियावरच्या बंधनाच काय?”

अक्षय केळकरची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या मताशी सहमती दर्शवती आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “खरं आहे…हे सगळं बंद झालं पाहिजे, असं मला वाटतंय.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, एकदम बरोबर आहे आणि यावर काही नियम असावेत. तसंच तिसऱ्या नेटकरीने लिहिलं, “खरंच यार, मी त्या रीलमुळे वैतागली. नको त्या रील पॉप होतात.”

दरम्यान, अक्षय केळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी अक्षय ‘अबीर गुलाल’ मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने अगत्यची भूमिका साकारली होती. पण, त्याच्या या मालिकेने अवघ्या काही महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेतला. टीआरपीच्या कारणास्तव ‘अबीर गुलाल’ मालिका बंद करण्यात आली. सध्या अक्षय वैयक्तिक आयुष्यात व्यग्र आहे. मे महिन्यात अभिनेता बोहल्यावर चढणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor akshay kelkar talk about over obscene content on social media pps