Zee Marathi Show Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम गेली वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘लय भारी’ या चित्रपटाच्या निमित्ताने या शोची सुरुवात झाली होती. १८ ऑगस्ट २०१४ मध्ये या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला होता. यानंतर सलग १० वर्षे हा कार्यक्रम सुरू होता. २०२४ मध्ये टीआरपीच्या कारणास्तव ‘चला हवा येऊ द्या’ने काही महिन्यांसाठी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.
आता ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या सीझनचं स्वरुप काहीसं बदलण्यात आलं आहे. यंदा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑडिशन्स घेण्यात आल्या आहेत. आता नव्या सीझनची सर्वत्र चर्चा सुरू असताना लोकप्रिय मराठी अभिनेत्याने ‘चला हवा येऊ द्या’साठी खास पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे आयुष संजीव.
‘३६ गुणी जोडी’ या मालिकेमुळे आयुष घराघरांत लोकप्रिय झाला. याशिवाय तो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सुद्धा झळकला होता. या शोमध्ये काम करण्याचा अनुभव आयुषने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सांगितला आहे.
अभिनेता लिहितो, “चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम माझ्यासाठी फक्त एक मंच नव्हता, तर ‘झी मराठी’ वाहिनीने दिलेलं एक सुंदर गिफ्ट होता. माझा पहिला व्हायरल व्हिडीओ इथूनच आला होता आणि अजूनही बरीच लोकं मला त्या व्हिडीओमुळे ओळखतात, इथली संपूर्ण टीम, कलाकार, दिग्दर्शक, प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट, सगळेच अतिशय प्रेमळ, व्यावसायिक आणि कलाकारांना समजून घेणारे आहेत. नवोदित कलाकारांनाही इथं मोकळेपणाने व्यक्त होता येतं. डॉक्टर निलेश साबळे सरांनी मला ओळखून, समजून घेतलं आणि व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी कायम आभारी आहे. थँक्यू झी मराठी.”
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’चा नवीन सीझन २६ जुलैपासून सुरू होत आहे. यंदा डॉ. निलेश साबळेऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहे. श्रेया बुगडे, गौरव मोरे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव हे कलाकार या नव्या पर्वात झळकणार आहेत.