ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज १० वा स्मृतिदिन आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा खून झाला होता. दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक गोष्टही सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण माने हे सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेमुळे चर्चेत आहेत. या मालिकेत ते सिंधुताईच्या वडिलांची म्हणजेच अभिमान साठे यांची भूमिका साकारताना दिसत आहेत. किरण माने हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांची पोस्ट

“लै भारी गोष्ट हाय भावांनो. चार्वाकाची. चार्वाक, प्राचीन भारतातला पहिला समाजसुधारक… त्याच्या बायकोच्या लक्षात येत नव्हतं की नवरा नेमकं का करतोय हे काम? “आपला नवरा उगीचंच लोकांना ‘बुद्धी वापरा, अंधविश्वास ठेवू नका’ असं सांगत फिरतोय. चमत्कार म्हणून कायतरी असतं की.. जुनीजाणती माणसं काय येडी हायेत का?” असं तिचं म्हणनं होतं. एका मध्यरात्री चार्वाकानं आपल्या बायकोला गावच्या वेशीजवळ नेलं. तिथनं धुळीच्या रस्त्यावर हाताचे पंजे विशिष्ट पद्धतीनं उठवत उठवत तो गावातल्या चौकापर्यंत आला. नंतर दोघंबी घरी गेले…

…दुसर्‍या दिवशी सकाळी तो पुन्हा बायकोला घेऊन चौकात आला. धुळीतल्या खुणा बघून गांवातली लोकं एकमेकांत चर्चा करायला लागलेवते. एका बुजुर्गानं सांगीतलं.”हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत.” सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला. ‘रात्रीच्या वेळी लांडगा येतोय’, अशी अफवा पंचक्रोशीतल्या घराघरात पसरली.

…हे सगळं चार्वाक आणि त्याची बायको यांच्यासमोर घडलं. चार्वाकानं बायकोला विचारलं, “या धुळीत हे काय आहे ?” ती म्हणाली, ‘हे तुमच्या हाताचे ठसे आहेत !” तो म्हणाला, “कायतरीच काय? गांवच काय अख्खी पंचक्रोशी म्हणतीय, हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत.. ते काय वेडे आहेत का?” यावर ती म्हणली, “पंचक्रोशीतल्याच काय, सगळ्या जगातल्या लोकांनी येऊन मला तसं सांगितलं, तरी मी ते खरं मानणार नाही. कारण, हे ठसे तुम्ही आपल्या हातांनी उठवल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.” चार्वाक म्हणाला, “मग इतकी वर्षं मी तरी लोकांना दुसरं काय करायला सांगतोय ?”

…विवेकी विचार म्हणजे काय? याचं याहून चांगलं उदाहरण नाय माझ्या भावांनो. विवेकी माणूस ऐकलेली गोष्ट नीट पडताळून पाहून,परीक्षा करून मग खरं-खोटं, योग्य-अयोग्य ठरवतो. मुर्ख माणूस दुसरा सांगेल ते ऐकून आंधळा विश्वास ठेवतो.

आज आपण सगळे सुशिक्षित आहोत. कुठलीबी गोष्ट असूद्या… व्हाॅटस् ॲॅपवरचा फाॅर्वर्डेड मेसेज असूद्या, नायतर न्यूज चॅनलवरची बातमी असूद्या… त्या गोष्टीची नीट, चारीबाजूनी, मेंदू वापरून चिकीत्सा केल्याशिवाय आंधळेपणानं विश्वास कसा ठेवू शकतो आपण? ‘आपली बुद्धी वापरायचं स्वातंत्र्य’ , ‘आपला विवेक वापरायचा अधिकार’ या निसर्गानं आपल्याला दिलेली लै लै लै मोलाच्या देनग्या हायेत, त्याचा व्यवस्थित वापर करा, हे सांगीतलंवतं पाच हजार वर्षांपूर्वीच्या चार्वाकांनी… अडीच हजार वर्षांपूर्वीच्या बुद्ध, बसवण्णा, चक्रधरस्वामींनी… तीनशे वर्षांपूर्वीच्या तुकोबारायांनी.. आनि आजच्या दाभोलकरांपर्यन्त सगळ्यांनी ! चार्वाकाला लोकांनी जाळून मारलं… चक्रधरस्वामी आणि तुकोबाराया अचानक बेपत्ता झाले…कुणी म्हणे तुकोबा गरूडावरून वैकुंठी गेले..कुणी म्हणे चक्रधर उत्तरेकडे निघून गेले.. आणि दाभोलकरांना तर… असो.

आजच्या दिवशी फक्त अभिवादन करन्यापेक्षा त्यांचा ‘विचार’ पुढच्या पिढीत रूजवूया, मुरवूया, भक्कम करूया… चार्वाकासारखं किमान आपल्या घरात तरी ते आपण करू शकतो. एवढं जरी आपण केलं, तरी या महापुरूषांचं आपल्यासाठी जगणं आणि आपल्या सगळ्यांच्या हितासाठी मरणंबी सार्थकी लागंल !” असे किरण माने यांनी म्हटले आहे.

दरम्यान किरण माने यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने ‘अप्रतिम… मोजकेच पण झणझणीत…..’ अशी कमेंट केली आहे. तर एकाने ‘वैचारिक क्रांतिवीर ..किरण माने …’ अशी प्रतिक्रिया कमेंट करत दिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kiran mane facebook post for activist dr narendra dabholkar on his tenth death anniversary nrp