Marathi Actor On Thane Ghodbunder Road Condition : काही दिवसांपासून ठाणे-घोडबंदर रोड हा चर्चेत येत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे या रस्त्यांचं सतत चर्चेत राहण्याचं मुख्य कारण आहे. गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या अवजड वाहनचालकांसाठी तसंच अनेक नोकरदार वर्गासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते.

ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे तेथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असते आणि त्याचा त्रास अनेक सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. सामान्यांप्रमाणेच अनेक कलाकार मंडळीसुद्धा या खड्ड्यांना वैतागली आहेत. अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत कलाकार मंडळी त्यांच्या तक्रारी सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसत आहेत. अशातच आता या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आपले प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अभिनेते मिलिंद फाटक यांनी ठाणे-घोडबंदर रस्ता आणि त्यावरील खड्डे याबद्दल ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं म्हणणं मांडलं. त्याबद्दल ते म्हणतात, “गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ ही मालिका ठाणेमधील ओवळा नाका, घोडबंदर रोड येथे एका स्टुडिओमध्ये सुरू आहे. मी अंधेरी, लोखंडवाला इथे राहतो. तिथून प्रवास करीत मी येथे शूटिंगसाठी येतो. ज्या प्रवासाला फेब्रुवारीपासून सुरुवात झाली, तेव्हा साधारण एक तास वगैरे लागायचा. पॅकअपनंतर तासाभरात मी घरी पोहोचायचो.”

बिकट, भीषण, जीवघेणा आणि यातनांनी भरलेला प्रवास : मिलिंद फाटक

त्यानंतर ते म्हणतात, “काही दिवसांपासून मी दहिसर मेट्रो, मग तिथून रिक्षा करून घोडबंदर रोडने इथे येत आहे. पण, इथल्या रस्त्यांची जी काय अवस्था व्हायला लागली… अवस्था हा शब्द खूपच साधारण शब्द आहे. खरं तर खूपच बिकट, भीषण, जीवघेणा आणि अतिशय यातनांनी भरलेला तो प्रवास सुरू झाला होता. कारण- घोडबंदर रोडवरून तुम्ही जेव्हा मिरा रोड, फाऊंटन हॉटेल सोडता आणि ठाण्याकडे यायला लागता, तर तिथे रस्ता उरलेलाच नाही; फक्त खड्डे नी खड्डेच आहेत.”

आता दुबईमार्गे ठाण्यात येणं सोपं जाणार आहे बहुतेक : मिलिंद फाटक

पुढे मिलिंद म्हणाले, “मोठे ट्रक्स आणि सर्व प्रकारची वाहने, त्यांचे चालक जीव धोक्यात घालून येत या रस्त्यावरून येत होते. कारण- सर्वांना पैसे कमवायचे आहेत, काम करायचं आहे आणि मुंबईसारख्या शहरांत जगायचं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही पर्यायच नाही. आता काही दिवसांत माझ्या कानावर एक विनोद येत आहे, तो म्हणजे मी आधी व्हाया मिरा रोड-घोडबंदरने येत होतो. मग मी पवई-घाटकोपरमार्गे यायला लागलो, खरं तर ते खूपच खर्चिक आहे. आता दुबईमार्गे ठाण्यात येणं सोपं जाणार आहे बहुतेक. हा विनोद सोडून द्या.”

प्रवासासाठी चांगला रस्ता मिळणं हा नागरिकांचा हक्क : मिलिंद फाटक

पुढे मिलिंद यांनी सांगितलं, “या रस्त्याच्या समस्येशी जे कोणी लोक संबंधित आहेत, त्यांनी या अडचणी दूर करा. कारण- लोकांना ये-जा करण्यासाठी एक चांगला रस्ता मिळणं हा त्यांचा हक्क आहे. हो हक्कच आहे! हे मी जबाबदारीनं बोलत आहे. कारण- प्रवासासाठी एक चांगला रस्ता उपलब्ध करून देणं हे सगळ्या संबंधितांचं महत्त्वाचं काम आहे, बाकी सगळी महत्त्वाची कामं सोडून…”

पुढे ते असं म्हणतात, “आता हा कोण मिलिंद फाटक? काय तरी बोलत आहे? कशाला लक्ष द्यायचं? असं बोलून दुर्लक्ष करणार असाल… तर माझं काही म्हणणं नाही. मला प्रवास करायचाच आहे, मला पैसे कमवायचेच आहेत. मला मुंबईसारख्या शहरात जगायचंच आहे. त्यामुळे हा सगळा यातनांनी भरलेला प्रवास करीत मी शूटिंगला येणार आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करीत राहणार. त्यांना हसवत राहणार, त्यांना रडवत राहणार… जरी मी रडत रडत प्रवास करीत असलो तरी… पण कृपया या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्या.”