Shiv Thakre Shares Handmate Fort Video : देशभरासह संपूर्ण महाराष्ट्रातही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय. फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि दिव्यांच्या रोषणाईनं अवघं शहर न्हाऊन निघालं आहे. फटाके, फराळ, रांगोळी यांसह महाराष्ट्रातील दिवाळीची एक खासियत म्हणजे, दगड-माती वापरून उभारले जाणारे किल्ले. महाराष्ट्रात दिवाळीच्या सणात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बनवण्याची परंपरा आहे.
गावागावांत बच्चे कंपनी स्वत:च्या हातांनी किल्ले साकारते. अशातच आता मराठी कलाकारानं छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला साकारत परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. हा मराठी कलाकार म्हणजे शिव ठाकरे. शिव ठाकरेनं स्वत:च्या हातांनी छात्रपती शिवाजी महाराजांचा मातीचा किल्ला साकारला असून हा किल्ला बनवतानाचे खास क्षण त्यानं सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
शिव ठाकरे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसतो. अशातच त्यानं स्वत:च्या हातांनी मातीचा किल्ला बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शिव लहान मुलांबरोबर किल्ला साकारत आहे. स्वत:च्या हातांनी शिवनं या किल्ल्याला रंगकाम केलं. तसंच त्यानं स्वत:च्या हातांनी किल्ल्यावर झेंडेही लावले. तसंच त्यानं किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मूर्तीही ठेवली.
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करीत शिव म्हणतो, “छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला साकारल्याशिवाय दिवाळी पूर्ण झाली असं वाटतच नाही. दिवाळीत किल्ला बांधणं म्हणजे फक्त एक खेळ किंवा प्रात्यक्षिक नव्हे, तर तो शिवरायांच्या महान पराक्रमाला मानाचा मुजरा करण्याचा आणि आपल्या गौरवशाली इतिहासाला जिवंत ठेवण्याचा एक सुंदर प्रयत्न असतो.”
शिव ठाकरे प्रत्येक मराठीसण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करताना दिसतो. आईवडील, बहीण आणि लाडकी आजीबरोबर तो प्रत्येक सण साजरा करतो. गणपती असो, होळी असो किंवा दिवाळी असो… शिव प्रत्येक सणात आनंदानं आणि उत्साहानं सहभागी होतो. तसंच तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनासुद्धा त्याच्या आनंदात सहभागी करून घेतो. या मनमिळाऊ स्वभावामुळे शिवची ‘आपला माणूस’ अशी एक वेगळी ओळख आहे.
