Priya Marathe Death: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने कलाकारांसह चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीचे कर्करोगाने निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुशांत शेलार यांनी पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
प्रियाच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते सुशांत शेलार यांनीदेखील पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी प्रियाचा फोटो शेअर करीत लिहिले, “भावपूर्ण श्रद्धांजली! प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनाने मराठी, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीने एक उज्ज्वल, गुणी कलाकार गमावला आहे.”
“कर्करोगाशी धैर्यानं झुंज देत केवळ ३८ व्या वर्षी त्यांची जीवनयात्रा संपली. ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. ‘पवित्र रिश्ता’मधील वर्षा, ‘साथ निभाना साथिया’मधील भुवानी, तसेच मराठी मालिकांमधील त्यांच्या असंख्य भूमिका गाजल्या. प्रत्येक सादरीकरणातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला.
“ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबीय व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो”, असे लिहीत सुशांत शेलार यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करीत हे धक्कादायक असल्याचे लिहिले; तर काहींनी भावपूर्ण श्रद्धांजली अशा कमेंट्स केल्या आहेत.
“खूप वाईट वाटले…”
सुशांतसह मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. अमृता खानविलकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रियाचा फोटो शेअर करीत, खूप धक्कादायक आहे, असे लिहिले. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत दिसणारी अमृता देशमुखने लिहिले, “प्रियाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर खूप वाईट वाटले. खूप लवकर गेलीस, तुझ्या आत्म्यास शांती लाभो”, असे म्हणत तिच्या भावना व्यक्त केल्या.
अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांनी लिहिले, “खूप प्रेमळ व उदार व्यक्ती, तुझ्या पुढच्या प्रवासासाठी प्रार्थना करीत आहे.” सुरभी भावेने, भावपूर्ण श्रद्धांजली प्रिया, असे लिहिले. तर श्रुती मराठेनेदेखील हे खूप धक्कादायक आहे, तुझ्या आत्म्यास शांती लाभो, असे लिहीत भावना व्यक्त केल्या.
प्रियाच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिने चार दिवस सासूचे, बडे अच्छे लगते हैं, पवित्र रिश्ता, अशा गाजलेल्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. तिच्या भूमिका विशेष गाजल्या.