अलीकडच्या काळात मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार समाजात न पटणाऱ्या किंवा चुकीच्या वाटणाऱ्या घटनांबाबत आपलं स्पष्ट मत व्यक्त करताना दिसतात. सध्या टीव्ही, मोबाइल, टॅबलेट या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं वेड लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना लागलं आहे. लहान मुलं तर अनेकदा मोबाइलवर कार्टुन पाहिल्याशिवाय जेवत सुद्धा नाहीत…पालकांनी मोबाइल देण्यास नकार दिला तर, मोठमोठ्याने रडणं, न जेवता धिंगाणा घालणं असे प्रकार बरीच लहान मुलं करत असल्याचं अलीकडे पाहायला मिळतं. मोबाइलवर सतत कार्टुन पाहून लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता असते. एका मराठी अभिनेत्याला असाच काहीसा अनुभव आला आहे. 'का रे दुरावा' या मालिकेमुळे अभिनेता सुयश टिळक घराघरांत लोकप्रिय झाला. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नुकताच अभिनेता जेवायला एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. यावेळी त्याठिकाणी आलेला अनुभव सुयशने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सांगितला आहे. सध्याच्या कार्टुन्समधून मुलांच्या मनावर किती वाईट परिणाम होऊ शकतो, या कार्टुन्समधील आक्षेपार्ह भाषा यावर सुयशने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात… हेही वाचा : अनंत – राधिकाचा हळदी समारंभ! पत्नी रश्मी व आदित्य यांच्यासह उद्धव ठाकरेंची खास उपस्थिती, व्हिडीओ व्हायरल सुयश सांगतो, "मी आताच एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन आलो. तिकडे माझ्या शेजारच्या टेबलवर एक कुटुंब बसलं होतं. त्यांच्याबरोबर एक तीन ते चार वर्षांची मुलगी होती. ती मुलगी प्रचंड रडत होती. त्यामुळे तिच्या आई-बाबांनी तिला मोबाइलवर मोठ्या आवाजात एका कार्टुन लावून दिलं. मी सहसा असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. कारण, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण, त्या मोठ्या आवाजात लावलेल्या कार्टुनचे काही संवाद माझ्या कानावर पडले." अभिनेता पुढे सांगतो, "कार्टुनमधले ते संवाद ऐकून मला खरंच राहावलं नाही म्हणून हा व्हिडीओ मी करतोय. त्या कार्टुनमध्ये दोन मुलं आणि एक मुलगी असते. त्यातला एक मुलगा मुलीला उद्देशून म्हणतो, 'तुम कितनी क्यूट हो, क्या तुम्हे मैं प्यार से दीदी पुकार सकता हूं?' त्यावर त्या मुलाचा मित्र त्याला मागून मारतो आणि म्हणतो, 'अबे तू उसे प्रपोज करने आया था ना फिर दीदी क्यू बोल रहा है?' यावर पुन्हा पहिला मुलगा त्या मुलीला म्हणतो, 'मैं तो मजाक कर रहा था…क्या तुम्हे मैं प्यार से डिअर डार्लिंग बुला सकता हूं?' या सगळ्यावर ती कार्टुनमधली मुलगी हसते आणि म्हणते, 'तुम कितने क्युट हो…' शेवटी तो मित्र म्हणतो 'अरे वाह भाई तेरी तो निकल पडी." हेही वाचा : Marathi Serial Quiz : सदाबहार ‘वादळवाट’ मालिकेचे चाहते आहात? मग, ‘या’ १० प्रश्नांची द्या अचूक उत्तरं "या अशा आशयाचं कार्टुन नेमकं कोण बनवतंय आणि मुळात आजकालचे पालक आपल्या मुलांना हे अशा आशयाचं कार्टुन का दाखवतात? हे माझ्या समजण्यापलीकडे आहे." अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने मुलं काय पाहतात हे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांसदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी देखील सुयश टिळकच्या पोस्टवर कमेंट्स करत आपलं मत नोंदवलं आहे. "आपल्या काळात मोबाइल नव्हते तेच बरं होतं. मैदानी खेळ खेळायचो आताची मुलं २४ तास फक्त मोबाइल घेऊन बसतात", "खरंच बरोबर पॉइंट आहे या बोलण्यात", "हल्ली सगळेच कार्टून्स असेच असतात…राग येतो", अशा कमेंट्स करत "पालकांनी वेळीच लक्ष दिलं पाहिजे" असंही नेटकऱ्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये म्हटलं आहे.