Yogita Chavan Saourabh Chaughule : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षांत या दोघांचा संसार मोडल्याचं म्हटलं जातंय.
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिता चव्हाण व सौरभ चौघुले मुख्य भूमिकेत होते. सौरभने मल्हार तर योगिताने अंतरा हे पात्र साकारले होते. छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय जोडी खऱ्या आयुष्यात प्रेमात पडली आणि त्यांनी थाटामाटात ३ मार्च २०२४ रोजी लग्न केलं होतं. पण आता मात्र ते वेगळे जात आहेत, असं म्हटलं जात आहे.
सौरभ चौघुले व योगिता चव्हाण यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील फोटोंमुळे ते विभक्त झाल्याच्या चर्चा होत आहेत. सौरभ व योगिता दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही. त्यांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी लग्नाचे व इतर सर्व फोटो ज्यात ते दोघेही होते, ते हटवले आहेत.
योगिता व सौरभ दोघांनी इन्स्टाग्रामवर लग्नातील विविध सोहळ्यांचे त्याचबरोबर हनिमूनला गेल्यावर तिथले काही फोटो शेअर केले होते. पण त्यापैकी कोणतेही फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर आता दिसत नाही. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे काही फोटो अजूनही आहेत, पण त्यात ते एकटेच आहेत.
सौरभ व योगिता यंदाचे सण-उत्सव साजरे केले, पण त्या फोटोंमध्येही दोघे एकत्र नव्हते. योगिताने गणेशोत्सवाचा व्हिडीओ शेअर केला, त्यात सौरभ दिसत नाही. नुकतीच दिवाळी झाली. योगिताने दिवाळी मित्र-मैत्रिणींबरोबर साजरी केली. त्यातही सौरभ नाही. तर सौरभनेही त्याचे सिंगल फोटो पोस्ट करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
काही दिवसांपूर्वी सौरभने एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर योगिता कुठे आहे? योगिताबरोबर रील बनव ना, अशा कमेंट्स होत्या. एकूणच दोघांचाही सोशल मीडियावरचा वावर पाहता ते आता एकत्र नसल्याचं म्हटलं जात आहे. पण त्यांनी अद्याप त्याबद्दल जाहीरपणे सांगितलेलं नाही.
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत एकत्र काम करताना सौरभ व योगिता यांच्यात जवळीच वाढली. आधी मित्र असलेले सौरभ योगिता नंतर डेट करू लागले व एकत्र रील्स बनवू लागले. सौरभने प्रपोज केल्यावर योगिताने थोडा वेळ घेतला आणि होकार दिला. दोघांनी डिसेंबर २०२४ पर्यंत लग्न करायचं ठरवलं. पण अचानक योगिताने लग्नाचा निर्णय घेतला आणि सगळ्यांच्या तारखा जुळवून दोघांनी ३ मार्च ही तारीख लग्नासाठी निवडली होती.
सौरभ आणि योगिताने ३ मार्च २०२४ रोजी लग्न केलं. आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. सौरभ चौघुले किंवा योगिता चव्हाण यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिल्यावरच या चर्चा खऱ्या आहेत की नाही ते स्पष्ट होईल.
