"आम्हाला आमच्या कामाचे पैसे का मागावे लागतात..." मालिका विश्वाबद्दल सुकन्या मोने स्पष्टच बोलल्या | marathi actress Sukanya mone talk about payment delay during serial production nrp 97 | Loksatta

“आम्हाला आमच्या कामाचे पैसे का मागावे लागतात…” मालिका विश्वाबद्दल सुकन्या मोने स्पष्टच बोलल्या

“आम्हाला पैशांसाठी निर्मात्यांना फोन करावे लागतात.”

sukanya mone
सुकन्या मोने

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सुकन्या मोने यांना ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई या नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत एका खोडकर सुनेच्या आणि तिच्या खोडीवर कुरघोडी करणाऱ्या खट्याळ मिश्किल सासूची गोष्ट दाखवली जात आहे. या मालिकेच्या निमित्ताने सुकन्या मोने यांनी मानधनाबद्दल एक खंत व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे.

सुकन्या मोने या बऱ्याच कालावधीनंतर झी मराठी वाहिनीवर पुनरागमन केले. या मालिकेच्या निमित्ताने सुकन्या मोनेंनी ‘लोकमत’ या वृत्तपत्राच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मालिका इंडस्ट्रीबद्दल एक खंत व्यक्त केली.

सुकन्या मोने काय म्हणाल्या?

“अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई ही मालिका खूप वेगळी आहे. खरं तर मालिकेत काम केल्यानंतर केलेल्या कामाचे पैसे निर्मात्याला मागावे लागतात. मात्र या मालिकेचा अनुभव खूपच सुखद आहे. सासूच्या त्याच त्याच भूमिका समोर आणण्यापेक्षा आताचे विषय समोर आणा. अंबाडा किंवा साडी नेसणारी टिपिकल सासू अशीच एक तिची प्रतिमा मालिकांमधून तयार झालेली आहे. त्यामुळे आताच्या घडीच्या सासू दाखवल्या जाव्यात, याचे सीमोल्लंघन कुठेतरी झालं पाहिजे.

माझी आई ८९ वर्षांची आहे पण आज ती सुद्धा बॉबकट करते. नखांना नेलपॉलिश लावते, ड्रेस घालते तर मग आपण का मालिकेतून टिपिकल आई दाखवायची. नाती तीच असतील पण कुठेतरी या विचारांना छेद जाणे गरजेचे होते. झी मराठीने हे माझ्याबरोबर घडवून आणले आहे म्हणू​​न मला ही भूमिका करताना खूप मजा येते. ही मालिका सुबोध आणि मंजिरी भावे यांनी आणली आहे. सुबोधचा या गोष्टीत विशेष हातखंडा आहे. मात्र मंजिरीसुद्धा या सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळते.

मंजिरी सेटवर येताना आमच्यासाठी भरपूर काही खायला घेऊन येते. आमच्या आवडीनिवडी सुद्धा ती बघते. हे सगळे वातावरण नीट ठेवण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची असते. मात्र एक प्रश्न येतो तो म्हणजे पैशांचा. अनेकदा असे होते की, आम्ही काम करतो पण आम्हाला पैशांसाठी निर्मात्यांना फोन करावे लागतात. त्यांच्याकडून मागावे लागतात. अशा वेळेला खूप वाईट वाटते.

आपण त्यांच्यासाठी काम केले आहे. तुम्ही न सांगता आम्ही थांबतो ना. कधी एखादा सीन अर्धवट सोडून नाही जात ना. मग तसे न मागता पैसे द्या की आम्हाला. आम्हाला आमच्या कामाचे पैसे का मागावे लागतात? पण मंजिरीकडे काम करताना आम्हाला कधीच हे करावे लागले नाही. कान्हाज मॅजिक मधून आम्हाला समोरून चेक येतो. तसंच जर काही अडचण असेल तर दहा दिवसांत होईल असे सुद्धा सांगण्यात येते. त्यामुळे आम्हाला खात्री असते. आम्हाला सतत फोन करावा लागत नाही. त्या दृष्टीने सुद्धा मला हे अतिशय चांगलं असे प्रोडक्शन मिळाले आहे. ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि महत्वाचे म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रेमाने केल्या जातात”, असे सुकन्या मोने यांनी सांगितले.

दरम्यान सुकन्या मोने या या मालिकेत सासूची भूमिका साकारत आहे. तर खोडकर सूनच्या भूमिकेत स्वानंदी टिकेकर पाहायला मिळत आहे. त्यांनी ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये त्या झळकल्या. सध्या त्या अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत झळकताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:10 IST
Next Story
राखी सावंतच्या आईच्या निधनानंतर सलमान खानने अभिनेत्रीला केला फोन, माहिती देत भाऊ राकेश म्हणाला…