कलाकार आणि चाहता यांचं कायम एक अतूट नातं असतं. कलाकार हा कायम त्याच्या चाहत्यांसाठी आपली कला सादर करत करत असतो. तर चाहत्यांचंही आवडत्या कलाकारांवर प्रेम असतं. आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची प्रत्येक चाहत्याची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण होते; तेव्हा त्या चाहत्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. असाच आनंद एका लहान चाहत्याला गायक-अभिनेता उत्कर्ष शिंदेला भेटल्यानंतर झाला.

आपल्या आवडत्या कलाकाराला भेटल्यानंतरचा हा आनंद केवळ त्या लहान मुलालाच नव्हे; तर उत्कर्ष शिंदेलासुद्धा लहान चाहत्याला भेटून झाला. चाहत्याला भेटल्यानंतरचा हा खास क्षण आणि या आनंदी भावना उत्कर्षने त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. आपल्या गायकीने चर्चेत राहणारा उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो.

अशातच उत्कर्षने त्याच्या लहान चाहत्याच्या भेटीचा खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तो असं म्हणतो, “छोट्याश्या चाहत्याचा छोटासा हट्ट पूर्ण होताच त्याच्या चेहऱ्यावर फुललेलं स्मितहास्य पाहून आपली कला समृद्ध झाल्याचा स्वर्गानंद अनुभवता आला. एक बहारदार ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ – गझलांची मैफिल बघून हॉलच्या बाहेर आलो, तर एक छोटासा गोंडस चाहता भेटला.”

यानंतर उत्कर्ष शिंदे सांगतो, “त्या लहान मुलाने मम्मी मला यांच्याबरोबर सेल्फी पाहिजे म्हणत दोघे भेटले. दोघांशी संवाद झाला. मला तुमचं गाणं खूप आवडतं म्हणताच त्याच्या हट्टापायी माझं ट्रेंडिंग गाणं ‘उतरावा माझ्या भीमानं’ हे गाणं त्याच्याबरोबर बाहेर गात माझी वेगळी मैफिल सुरू झाली. कलाकार आणि प्रेक्षकांचं नातं किती निस्वार्थी असतं याचा प्रत्यय आला.”

उत्कर्ष शिंदे इन्स्टाग्राम व्हिडीओ

यापुढे तो असं म्हणतो, “कला जोपासत असताना एक गोष्ट नक्की कळली फक्त मन जिंकलं की, माणसंही जिंकता येतात आणि त्या निस्वार्थी प्रेमासारखी मिळकत दुसरी कोणतीच नाही. त्या बाळाचे लाड करून आशीर्वाद देत तेथून निघालो आणि माझ्याबरोबर विचार घेऊन आलो. आपलं जगणं प्रेक्षकांसाठी होत आहे आणि असंच राहणार.” दरम्यान, उत्कर्षने शेअर केलेल्या या व्हिडिओखाली अनेकांनी त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.