Milind Gawali Shares Post For Father : मराठी मनोरंजन विश्वातल्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. आजवर अनेक मालिका, नाटक तसंच सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावरसुद्धा तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते अनेक आठवणी, किस्से वा प्रसंग शेअर करीत असतात. अशातच त्यांनी वडिलांबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांचे वडील पोलिस खात्यात होते. या पोस्टमधून वडिलांनी पोलिस खात्यात प्रामाणिकपणे काम केलं. तसेच निवृत्तीनंतरही त्यांनी कुठलीच केस सोडून दिली नाही, प्रत्येक केससाठी ते कोर्टात जात असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांच्यावर अन्याय झाल्याचं दु:खही मिलिंद गवळी यांनी या पोस्टमधून व्यक्त केलं आहे. मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नेमकं काय म्हणाले? चला जाणून घेऊ…

या पोस्टमध्ये मिलिंद गवळी म्हणतात, “माझे वडील श्रीराम गवळी यांनी त्यांच्या आयुष्याची ३७ वर्षं पोलीस खात्याला दिली आणि डिसेंबर १९९७ मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरसुद्धा त्यांनी रजिस्टर केलेल्या अनेक केसेस पुढची १५ वर्षं कोर्टामध्ये चालू होत्या. बहुतेक सगळेच आरोपी दोषी ठरले. खंडेलवाल लॅबोरेटरीची एक केस वडिलांनी क्राईम ब्रँचला असताना १९८३ मध्ये घेतली होती. २९ वर्षं ती केस चालली. त्याबाबत २०१२ मध्ये कोर्टानं निकाल दिला. खंडेलवाल लॅबोरेटरीच्या केसमध्ये आरोपीला सात वर्षांची शिक्षा झाली.”

पुढे मिलिंद गवळी लिहितात, “अनेक पोलीस अधिकारी निवृत्तीनंतरच्या केसेस सोडून देतात, परत कोर्टात येत नाहीत आणि म्हणून आरोपी सहज सुटतात. माझे वडील कोर्टाच्या कुठल्याच तारखेला गैरहजर राहिले नाहीत. अनेक वेळा जे न्यायाधीश असायचे, त्यांनाही आश्चर्य वाटायचं की, निवृत्त होऊन इतक्या वर्षानंतरसुद्धा हा ऑफिसर नित्यनियमाने केसच्या तारखेला कोर्टात हजर असतो.”

पुढे मिलिंद गवळी म्हणतात, “माझे वडील ओपन कॅटेगिरीमधले असल्यामुळे त्यांच्यावर खूप अन्याय झाला. वडिलांनी प्रामाणिकपणे काम करूनसुद्धा ए.सी.पी. म्हणूनच रिटायर्ड झाले; पण त्यांच्या हाताखालचे अधिकारी, ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला होता, ते मात्र सीनियरिटी कमी असूनही आठ-आठ वर्षं डी.सी.पी. राहिले. पण, या गोष्टीचं त्यांना कधी काही वाटलं नाही. आपल्या हाताखाली शिकलेला अधिकारी वरच्या पोस्टवर येऊन बसला, तरीसुद्धा त्यांनी आपलं प्रामाणिकपणे काम करणं कधी सोडलं नाही. मला मात्र त्याचा खूप त्रास होत होता. सरकारी खात्यामध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीवर अन्याय होतो, अशी माझी धारणा झाली. कदाचित याच कारणामुळे मी रेडिओची नोकरी सोडली.”

पुढे ते असं म्हणतात, “अडीच वर्षांच्या सरकारी कामांमध्ये मला जाणवलं की, काम करणारी माणसं मरमर काम करीत असतात आणि अप्रामाणिक मजाच करीत असतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम न करणाऱ्याला घरी बसवतात, तसं सरकारी खात्यात बसवता येत नाही. माझ्या वडिलांसारखी प्रामाणिकपणे काम करणारी खूप माणसं आपल्या सरकारी खात्यात असतात आणि या अशा माणसांना कामाची सवय लागलेली असते. आजही माझ्या वडिलांना ८७ वर्षीसुद्धा काम करण्याची ऊर्जा असते.”

नंतर मिलिंद गवळी यांनी म्हटलं, “खरं तर शासनानं ५८ व्या वर्षी अशा व्यक्तींना निवृत्त करू नये. आमच्या पिढीला किंवा नवीन पिढीला प्रामाणिकपणे काम कसं करावं, हे शिकवण्यासाठी त्यांना अधिकार द्यावेत. गुन्हेगारी केसेस कशा रजिस्टर कराव्यात, पुरावे कसे गोळा करावेत, ते कोर्टामध्ये कसे मांडावेत, तरच आरोपी दोषी ठरतील. आपण रोज बघतोय पोलीस जीव धोक्यात टाकून आरोपी पकडतात आणि पुराव्याअभावी ते कोर्टातून सुटतात. या प्रामाणिक अधिकाऱ्यांना माझा सलाम.”

मिलिंद गवळी इन्स्टाग्राम व्हिडीओ

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मिलिंद गवळींनी म्हटलं आहे, “माझे वडील रिटायर झाले असले तरी अजूनही त्यांचं काम सुरू आहे. वडील पोलिस असतानाचा तो काळ खूप कष्टाचा होता. तेव्हा ते तीन-चार दिवस घरी येत नसत. बंदोबस्त असायचा किंवा दंगली आणि काय काय घडायचं. या सगळ्यामुळे मला वडिलांनी पोलिस खात्यात येऊ नको, असं म्हटलं होतं. तेव्हा वडील म्हणालेले की, आम्ही यासाठी कष्ट करतोय. कारण- तुम्ही मुलांनी चांगलं आयुष्य जगावं. या माणसांनी कष्ट केल्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीला चांगलं भविष्य मिळतं. मी पोलिस खात्यातल्या सगळ्या दिग्गजांचा आभारी आहे. तुम्ही आम्हाला सुंदर आयुष्य दिलंत.”