Milind Gawali Talk About Daughter : मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले लोकप्रिय अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद यांनी आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. टीव्हीवरील मालिकांमधूनही ते घराघरांत पोहोचले आहेत. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील त्यांचं अनिरुद्ध हे पात्र तर चांगलंच गाजलं. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते स्वत:चे फोटो-व्हिडीओ शेअर करतात. तसंच अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही शेअर करताना दिसतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या लेकीबद्दल अनेक गोष्टी सांगतात. अशातच मिलिंद गवळींनी त्यांची लेक मिथिला मनोरंजन क्षेत्रात का आली नाही, याबद्दल सांगितलं आहे.

मिलिंद गवळींची लेक मिथिला फिटनेस ट्रेनर आहे. मनोरंजन क्षेत्रात न येता तिने वेगळं क्षेत्र निवडलं आहे. याबद्दल मिलिंद गवळींनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं. यावेळी मिलिंद गवळी म्हणाले, “माझी मुलगी मिथिला ही सौंदर्याबाबत कोणत्याही हिंदी किंवा मराठी नायिकेला मात देईल. ती खूप हुशार आहे. मी जर तिला प्रोत्साहन दिलं असतं, तर तिने या इंडस्ट्रीत आपली छाप सोडली असती. तिने उत्तम अभिनय केला असता.”

यानंतर मिलिंद गवळी सांगतात, “पण मला वाटतं मी चुकीच्या क्षेत्रात आलो. मी एक अप्रशिक्षित अभिनेता आहे, त्यामुळे मला एखादी भूमिका साकारताना त्रास होतो, ताण येतो. ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्ध देशमुख ही भूमिका करताना मला त्रास झाला. तर या क्षेत्रात काम करताना अनेकदा ताण येतो. रात्री उशिरापर्यंत शूटिंग करावं लागतं. खूप दबाव असतो. भारतात NSD (National School of Drama) आहे, पण मी या क्षेत्रात आलो तेव्हा फक्त FTII (Film and Television Institute of India) होती आणि तिथे माझ्यावेळी अभिनय शिकवला जात नव्हता, त्यामुळे आपल्याकडे अप्रशिक्षित कलाकार आहेत.”

मिलिंद गवळी इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे ते म्हणाले, “मी मराठी इंडस्ट्रीतील अनेक व्यसनी कलाकार पाहिलेत, कारण अनेकांना तो ताण सहन करणं शक्य झालं नाही. आम्ही फक्त पडद्यावर दिसतो. आम्ही लोकप्रिय आहोत हे दिसतं, पण त्यामागे आम्ही भावभावनांशी खेळत असतो; तर त्यामुळे मला मिथिलासाठी हे क्षेत्र योग्य नाही असं वाटलं. तरीसुद्धा ती या सगळ्यावर मात करून लोकप्रिय होईल, पण या क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही काम मिळत नाही किंवा खूप टॅलेंटेड असूनही काम मिळत नाही.”

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद गवळींनी सांगितलं, “माझ्या वडिलांना मी पोलिस खात्यात जाऊ नये असं वाटायचं, कारण त्या क्षेत्रात काय काय होतं हे त्यांना माहीत होतं. तसंच या क्षेत्रातील मला माहिती आहे, त्यामुळे तिने या क्षेत्रात येऊ नये असं मला वाटतं. या क्षेत्रात तुम्हाला लोकप्रियता मिळेल, पण ती लोकप्रियता किती काळ टिकू शकेल हे सांगता येत नाही आणि हे मी जवळून पाहिलं आहे.”