Mrunmayee Deshpande on comeback in serials:अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लवकरच मनाचे श्लोक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती फक्त अभिनय करताना दिसणार नाही, तर तिने या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तसेच सिनेमाचे दिग्दर्शनही केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
अभिनेत्री सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आता या निमित्ताने तिने लोकशाही फ्रेंडली या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, पुन्हा मालिकाविश्वात कमबॅक करण्याचा विचार आहे का?
यावर अभिनेत्री म्हणाली, “मला मालिकांमध्ये काम करायला आवडेल, तशी विचारणासुद्धा सातत्याने होत आहे. पण, समस्या अशी आहे की मी सलग तीन-चार महिने कमिटमेंट देऊ शकते. काही मर्यादित स्वरुपाचा प्रोजेक्ट असेल तर मी करू शकते. पण, आयुष्याच्या या टप्प्यावर माझं फक्त दिग्दर्शन किंवा अभिनय यामध्येच करिअर सुरू आहे असं नाही, तर आमचं एक शेत आहे.
“निसर्ग तुम्हाला खूप…”
पुढे मृण्मययी म्हणाली, “मनाचे श्लोकमध्ये मनवाचं जे आयुष्य आहे, ते मी खरंच जगत आहे. महाबळेश्वरमध्ये आमचं शेत आहे. नील अँड मोमो ही आमची कंपनी आहे. माझं तिकडे मन रमतं, कारण मला वाटतं की निसर्ग तुम्हाला खूप जास्त शिकवतो, मोठं करतो, वाढवतो.
निसर्गाला तुमच्या आयुष्यात आणण्याची हीच योग्य वेळ आहे, कारण त्याला तुमच्या आयुष्यात यायचंच आहे, त्याला तुम्ही दूर केलं आहे. झाडं सगळीकडे होती, आपण तोडली. आपण त्याची कक्षा आपल्यापासून दूर केली. निसर्ग खूप शिकवतो. आयुष्यातील समतोल तुम्हाला बघायचा असेल तर मनाचे श्लोक सिनेमा बघितला पाहिजे.”
गौतमी देशपांडे काय म्हणाली?
गौतमी देशपांडे मालिकाविश्वात परतण्याबाबत म्हणाली, “ताई म्हणाली तसंच माझंसुद्धा आहे, कारण सलग दोन मालिका झाल्या आणि आता नाटकही चालू आहे; तर नाटकाचीसुद्धा एक मोठी कमिटमेंट असते. तर आता मी स्टेजवर असण्याचा आनंद घेत आहे. सिनेमांतही काम करायचे आहे, तर मालिकेला एक कमिटमेंट लागते. रोजचे १४ तास तुम्हाला द्यावे लागतात; तर तेवढी कमिटमेंट त्या माध्यमाची आहे. काही कमी कालावधीसाठीचं असेल, वर्षभरासाठीचं असेल तर नक्कीच करायला आवडेल; कारण आम्हा दोघींच्या करिअरची सुरुवात तिथूनच झाली आहे.
मृण्मयी देशपांडेला कुंकू, अग्नीहोत्र अशा मालिकांमधून मोठी लोकप्रियता मिळाली. तसेच काही रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन तिने केले आहे. गौतमी देशपांडेला तुला पाहते रे या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. दरम्यान, मनाचे श्लोक हा सिनेमा १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.