Vallari Viraj and Raqesh Bapat: अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज हे कलाकार ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचले आहेत. या मालिकेतील एजे व लीला ही पात्रे लोकप्रिय ठरली आहेत.

आता काही दिवसांपासून ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेचे चाहते भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता राकेश बापट व वल्लरी विराज यांनी एका मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले आहे.

राकेश बापट व वल्लरी विराज यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मालिका संपण्याबाबत, तसेच प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबाबत, याबरोबरच मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनेल बदलणार का, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी त्यांचे मत मांडले आहे.

मालिकेला व भूमिकेला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल राकेश बापट म्हणाला, “लोकांचं प्रेम बघून मन भारावून जातं. इतकं प्रेम अपेक्षित नव्हतं. आता लोक मालिकेचा हॅशटॅग करीत आहेत. ते ट्रेंडिंगला होतं. ते ऐकून बरं वाटतं. कारण- एवढं प्रेम नशिबात होतं आणि आहे. त्यांच्या प्रेमाबद्दल बोलण्यासाठी शब्द सापडत नाहीत.”

प्रत्येक रोमँटिक सीन…

एजे व लीलाच्या केमिस्ट्रीबद्दल बोलताना वल्लरी म्हणाली, “आम्ही सीन करताना खूप मजा करतो. ती मजा करता-करता आम्ही शूटिंग करतो. त्यामुळे ते सीन छान शूट होतात. विशेषत: आमचे जे दिग्दर्शक आहेत, जे खूप मेहनत घेतात. प्रत्येक रोमँटिक सीन कसा वेगळा करता येईल, याची ते काळजी घेतात. आमची मालिका लोकांना आवडते, यामागे सगळ्यांचे प्रयत्न आहेत. आमची संपूर्ण टीम मेहनत घेते.”

मालिका बंद करण्याचा निर्णय बदलणार का? यावर राकेश म्हणाला, “काही सांगता येत नाही. कारण- तो चॅनेलचा निर्णय असतो. कधी कधी ठरवलेलं असतं की, एक वर्षापर्यंत ही गोष्ट चालणार आहे. तसं बहुतेक होतं आणि त्याप्रमाणेच निर्णय घेतले आहेत. पण, मालिका चालू असेल किंवा बंद झाली तरी प्रेक्षकांचं जे प्रेम मिळालं आहे, तेच आम्ही घेऊन चाललो आहोत. आमच्याठी तेच पुरेसं आहे. आम्ही खूप मजा केली. एजे-लीलाच्या जोडीचं इतकं कौतुक झालं. पुरस्कार सोहळ्यात आम्ही सगळे पुरस्कार घेऊन आलो. तर त्यामुळे इतक्या कमी कालावधीत इतकं प्रेम मिळालं आहे. एवढं प्रेम मिळणं नशीब असतं. आम्ही आभारच मानू शकतो. आता पुढे मालिकेचं काय होणार, हे या क्षणी तरी सांगू शकत नाही.”

राकेश व वल्लरी यांनी प्रेक्षक जे कमेंट्स करतात, तेदेखील वाचत असल्याचे सांगितले. आपलं काम इतक्या बारकाईनं बघितलं जातं, त्याची दखल घेतली जाते, याबद्दल छान वाटतं. आम्हाला पत्रं येतात आणि चॉकलेट्स, भेटवस्तू दिली जातात.

प्रेक्षकांना आधीचा रागीट एजे आवडत असेल की आताचा शांत रोमँटिक एजे आवडत असेल?त्यावर वल्लरी म्हणाली की, आताचा शांत-रोमँटिक एजे प्रेक्षकांना आवडत असेल.

एजेला आधीची अल्लड लीला आवडते की आताची समजूतदार लीला आवडते? त्यावर राकेश म्हणाला की, मला आधीची लीला आवडायची. कारण- आम्हाला, भांडायला, चिडायला मिळायचं. त्यावर वल्लरी म्हणाली की, आम्हाला त्या भांडणाच्या सीन्सची आठवण येते. आम्हाला भांडण करायला खूप आवडायचं. असे म्हणत राकेश बापट व वल्लरी विराज यांनी मालिका, तसेच प्रेक्षकांचे प्रेम याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.