प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf)
यांचाही समावेश आहे. अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कला क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केल्याचे पाहायला मिळाले. याआधी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ते चित्रपटांबरोबर मालिकांमध्येही दिसले आहेत. आता कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्री नेहा शितोळेने अशोक सराफ यांचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. तिने अशोक सराफ यांच्याबरोबर एक फोटो शेअर करीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामाच्या पलीकडे…

अशोक मा. मा. या मालिकेतील अभिनेत्री नेहा शितोळेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने अशोक सराफ यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या पाठीमागे एक फळा दिसत आहे. त्यावर अशोक सराफ यांचे पद्मश्री मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले, “मागच्या फळ्यावर लिहिलेल्या महाराष्ट्र भूषण, विनोद सम्राट, मामा आणि आता पद्मश्री श्री अशोक सराफ या आणि अशा अनेक बिरुदांचं वलय आपल्या कामामुळे स्वतःभोवती घेऊन फिरणारा हा नट जेव्हा माणूस म्हणून भेटतो, कळतो, आपल्याला समजून घेतो, हळूहळू कामाच्या पलीकडे एका मित्रत्वाच्या भावनेनं त्याच्या अनुभवाच्या शिदोरीतला आणि रोजच्या डब्यातलासुद्धा खाऊ आपल्याबरोबर वाटून घेतो तेव्हा या खूप मोठ्या माणसाबरोबर काम करण्याचं भाग्य म्हणजे नक्की काय हे उमगतं. नशीब काढलंय मी एवढं नक्की. मामा, खूप खूप अभिनंदन आणि या शुभेच्छा मला प्रत्यक्ष तुम्हाला देता येत आहेत. याबद्दल स्वतःचंही आज अभिनंदन करावं, असं वाटतंय”, असे म्हणत अभिनेत्रीने अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.

नेहा शितोळे अशोक मा. मा. या मालिकेत फुलराणी ही भूमिका निभावताना दिसत आहे. अभिनेत्री बिग बॉस मराठीच्या दुसर्‍या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिने ‘टॉप २’पर्यंत मजल मारली होती. या पर्वाचा विजेता शिव ठाकरे ठरला होता.

दरम्यान, अशोक सराफ ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातून नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे पाहायला मिळाले. आता अशोक मा. मा. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha shitole shares special post for ashok saraf after the announcement of padma shri award says herself lucky nsp