Marathi Actor Nilesh Sabale : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं नवीन पर्व येत्या २६ जुलैपासून सुरू होणार आहे. मात्र, यंदाच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना दोन मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळेल. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची गेली १० वर्षे धुरा सांभाळणारा डॉ. निलेश साबळे यंदाच्या पर्वात झळकणार नाहीये. तसेच भाऊ कदमही यात दिसणार नाही. यावर्षी या कार्यक्रमाचं स्वरुपही बदलण्यात आलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळेने ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाविषयी भाष्य करत अभिजीत खांडकेकरला या सीझनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निलेश साबळे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाविषयी ‘लोकशाही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं नवीन पर्व जेव्हा सुरू होणार होतं. तेव्हा मला चॅनेलकडून विचारणा झाली होती. आमची मिटींग सुद्धा झालेली फक्त सध्याची परिस्थिती अशी आहे की, मी एक सिनेमा करतोय. त्या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा मी स्वत: करतोय…बऱ्यापैकी तो मोठा सिनेमा आहे. त्यात खूप कलाकार आहेत आणि भाऊ कदम सुद्धा त्या सिनेमात आहे. त्या सिनेमाचं शूटिंग अजून दीड-दोन महिने असेल असं मला वाटतंय.”
“एकंदर शो सुरू करायचा असं जेव्हा ठरलं तेव्हा तारखा जुळणं फार कठीण झालं होतं. कारण, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचं नवीन पर्व आता लगेच लॉन्च होतंय आणि माझ्याकडे खरंच वेळ नव्हता. त्यामुळे या पर्वात आम्ही नाहीये.” असं निलेश साबळेने स्पष्ट केलं.
या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर करतोय, त्याच्याशी भेट झालीये का? त्याला टिप्स दिल्या आहेत का? यावर निलेश साबळे सांगतो, “मी आणि अभिजीत महाराष्ट्राचा सुपरस्टारपासून एकत्र आहोत. आम्हाला ज्या हॉटेलवर ठेवलं होतं, तिथे दोघा-दोघांना एक रूम दिली होती. तेव्हा अभिजीत माझा रूम पार्टनर होता. तो अनेकदा वैतागत असेल कारण, मी त्याला रात्रभर किस्से सांगायचो. माझ्या रूममध्ये बरेच कलाकार असायचे आणि मी सगळ्यांना किस्से सांगत बसायचो. तेव्हा तो मला खूप ओरडायचा…तू रात्रभर किस्से सांगतोस, दुसऱ्या दिवशी माझं सादरीकरण असतं वगैरे…हे सगळं तो गमतीत म्हणायचा. पण, अभिजीत खूप गोड माणूस आहे. त्याने त्याच्या पद्धतीने त्याचं एक वेगळं विश्व निर्माण केलंय. तो उत्तम अभिनेता आहेच…पण, आधी तो आरजे होता त्याचा संपूर्ण प्रवास मी पाहिलाय. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचं हे नवीन पर्व अभिजीत त्याच्या बाजूने एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल यात काहीच शंका नाही.”
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा नवीन सीझन २६ जुलैपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे. यामध्ये अभिजीत खांडकेकर, श्रेया बुगडे, प्रियदर्शन जाधव, गौरव मोरे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके हे कलाकार झळकणार आहेत.