‘पारू’ (Paaru) ही लोकप्रिय मालिकांपैकी आहे. या मालिकेचे वेगळ्या धाटणीचे कथानक, अहिल्यादेवीसारखी आत्मनिर्भर, कडक शिस्तीची आई, आदित्यसारखा गुणी मुलगा आणि पारूसारखी आज्ञाधारक मुलगी, तसेच प्रीतम, प्रिया, अनुष्का, दामिनी, दिशा, श्रीकांत, गणी, पारूचे वडील मारुती, अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसतात. या मालिकेत शरयू सोनावणे(Sharayu Sonawane) ही पारूची भूमिका साकारताना दिसत आहे. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत पारू या भूमिकेकडून काय शिकायला मिळाले, याबरोबरच सध्या ‘पारू’ व ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांचा महासंगमाबद्दल काय वाटतं, काय अनुभव होता, यावर वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरयू सोनावणे पारू या भूमिकेविषयी काय म्हणाली?

अभिनेत्री शरयू सोनावणेने नुकतीच ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मालिकेत साकारलेल्या पारू या भूमिकेविषयी बोलताना शरयूने म्हटले, “पारू या पात्राचा मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला उपयोग होतो. कितीतरी गोष्टी पारूकडून शिकण्यासारख्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत, ती परिस्थिती कशी सावरून घ्यायची, प्रत्येक संकटाला कसं शांतपणे सामोरं जायचं, प्रत्येक गोष्टीबाबत कसा विचार करायचा, या गोष्टी मी पारूकडून शिकते. त्यामुळे मला आनंद आहे की, मला या मालिकेत पारू हे पात्र साकारायला मिळतंय. माझ्या परीनं ते पूर्णपणे साकारण्याचा प्रयत्नही करतेय.”

महासंगमाबाबत अभिनेत्री म्हणाली…

सध्या ‘पारू’ व ‘लक्ष्मी निवास’ या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. जयंत-जान्हवीचे लग्न व आदित्य-अनुष्काचा साखरपुडा या निमित्ताने ही दोन्ही कुटुंबे एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. या महासंगमाविषयी बोलताना शरयूने म्हटले, “इतक्या वेगवेगळ्या कलाकारांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. त्यामुळे मला माझं प्रोफेशन खूप आवडतं. कारण- छान मोठे कलाकार, दिग्दर्शक यांच्याबरोबर काम करायला मिळतं. त्यामुळे जसा हा महासंगम आहे, तसा हा माझा महाअनुभव आहे. त्यामुळे मला हा महासंगम खूप आवडला आहे. हा संपणार तर आहे; पण तो संपूच नये, असे मला वाटते. परत परत वेगवेगळ्या कलाकारांबरोबर महासंगम करता यावेत, अशी माझी इच्छा आहे”, असे म्हणत विविध कलाकारांबरोबर पुन्हा काम करायला आवडेल, असे शरयूने म्हटले आहे.

शरयू सोनावणेने साकारलेली पारू ही भूमिका प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असल्याचे दिसतेय. कमी शिकलेली, गावाकडे लहानाची मोठी झालेली, वडिलांची आज्ञाधारक मुलगी, गणीची प्रेमळ बहीण, कोणत्याही संकटातून मार्ग काढण्याची हिंमत असलेली, किर्लोस्कर घरासाठी काहीही करायला तयार असलेली, अहिल्या किर्लोस्करला देवी मानणारी ही पारू सर्वांची लाडकी आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, किर्लोस्कर हे एक सधन कुटुंब आहे. या कुटुंबात मारुती वाहनचालक म्हणून काम करतो. पारू ही त्याची मुलगी आहे. अहिल्यादेवी किर्लोस्करने या कुटुंबाला नेहमीच मदत केल्यामुळे त्यांना तिच्याविषयी आदर आहे. पारू अहिल्यादेवीला देवी मानते. पारू त्यांच्या कंपनीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडरही आहे. प्रॉडक्टच्या जाहिरातीच्या शूटिंगवेळी आदित्यने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. ती घटना पारू खरी समजून, आदित्यला तिचा नवरा मानते; पण आदित्य तिला चांगली मैत्रीण मानतो. आता मात्र अनुष्का आदित्यच्या आयुष्यात आली आहे. ती किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे.

दरम्यान, आता अनुष्काचे सत्य सर्वांसमोर येणार का, पारू पुढे काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru fame marathi actress sharayu sonawane on mahasangam of serials also shares what she learn from her character of paaru nsp