Actress Pallavi Rao Divorce: २०२५ या वर्षात अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी घटस्फोटाच्या घोषणा केल्या. नुकतंच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील लता सभरवालने पती संजीव सेठपासून विभक्त झाल्याचं जाहीर केलं. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री शुभांगी अत्रेचा घटस्फोट झाला त्यानंतर आता एका अभिनेत्रीने पतीपासून विभक्त होत असल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

‘पांड्या स्टोर’ मालिकेत ‘प्रफुला’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री पल्लवी राव ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पल्लवीने पती सूरज रावपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन आठवड्यांपासून पतीबरोबर राहत नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. घटस्फोटाचा निर्णय का घेतला, त्याबद्दल पल्लवी रावने सांगितलंय.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पल्लवी म्हणाली, “सूरज आणि मला दोन मुलं आहेत. मागील काही वर्षांपासून आमच्या लग्नात अडचणी येत होत्या आणि आता आम्ही शेवटी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला २१ वर्षांची मुलगी आणि १८ वर्षांचा मुलगा असल्याने घटस्फोट घेणं हा एक कठीण निर्णय होता. पण कधीकधी परस्पर संमतीने वेगळं होऊन शांततेत जीवन जगणं चांगलं असतं. मी सूरजचा आदर करते आणि त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देते.”

२२ वर्षांपूर्वी पल्लवी- सूरजने केलेलं लग्न

अभिनेत्री पल्लवी राव ‘कयामत से कयामत तक’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ आणि ‘शुभारंभ’ सारख्या अनेक टीव्ही शोसाठी ओळखली जाते. सूरज ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ आणि ‘शका लाका बूम बूम’ सारख्या प्रसिद्ध मालिकांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखला जातो. सूरज व पल्लवी यांची भेट मुंबईत एका शोच्या सेटवर झाली होती. प्रेमात पडल्यावर २००३ मध्ये पल्लवीने दिग्दर्शक सूरज रावशी लग्न केलं होतं आणि आता २२ वर्षांनंतर त्यांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला आहे.

काही काळापूर्वी दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत पल्लवीने म्हटलं होतं की तिला नेहमीच दमदार भूमिका करायला आवडतात. “पांड्या स्टोरमधील माझी भूमिका खूप दमदार होती. ती मालिकाही खूप विनोदी होती. संपूर्ण टीमबरोबर काम करायला खूप मजा आली होती. मला नेहमीच गंभीर आणि दमदार भूमिका करायला आवडतात,” असं पल्लवी तिच्या भूमिकेबद्दल म्हणाली होती.