Paru Fame Sharayu Sonawane Shared Bad Experience : शरयू सोनावणे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘पारू’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. यापूर्वीसुद्धा तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अशातच तिने तिच्या पूर्वीच्या भूमिकांबद्दल सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
पूर्वी ‘पारू’ मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू असायचं, पण आता नुकताच मालिकेचा सेट मुंबईत शिफ्ट करण्यात आला आहे. यानिमित्त मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर पारूने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या पूर्वी काम केलेल्या मालिकेतील भूमिकेबद्दल तसेच तिच्या खासगी आयुष्यात तिला आलेल्या एका वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
शरयूने ‘कलाकृती मीडिया’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने ‘पारू’ आणि तिची याआधीची मालिका ‘पिंकीचा विजय असो’बद्दल सांगितलं आहे. मुलाखतीत तिला तुझ्या आयुष्यातील अशी भूमिका कोणती, ज्यामुळे तुला प्रसिद्धी मिळाली पारू की पिंकी; असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “पिंकी. पारूलाही लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे, ही मालिका करताना मला जास्त प्रसिद्धी मिळाली. पण, अजूनही पिंकीची भूमिका लोकांना जास्त लक्षात आहे; कारण नायिका म्हटलं की ती रडणारी, मुळमुळीत वगैरे असंच असतं असं समीकरण झालंय; पण पिंकी तशी नव्हती. ती कोणाचं ऐकूनच घ्यायची नाही, त्यामुळे लोकांना ती जास्त आवडायची.”
शरयू पुढे म्हणाली, “भविष्यात मला पारूसारखं पात्र साकारायला आवडेल.” यानंतर तिला, खऱ्या आयुष्यात तू ही अशीच आहे का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी माझा एक किस्सा सांगेन की, माझे बाबा पोलिस आहेत, त्यामुळे आमच्याकडे लहानपणापासून कोणाचं ऐकायचं नाही, मारायचं असं शिकवलं गेलं आहे. माझ्या भावानेही माझ्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना खूप मारलं आहे, हे करता आलं पाहिजे.”
शरयू सोनावणेला आलेला वाईट अनुभव
शरयू पुढे तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल म्हणाली, “मी आणि माझी आई एकदा चर्चगेट स्टेशनवरून चालत जात होतो. रात्री साडे आठ वगैरे वाजले असतील. तेव्हा एका माणसाने मला घाणेरड्या पद्धतीने धक्का दिला. मला तो विचित्र पद्धतीने हात लावून गेला. माझी आई पुढे होती, तिला माहीत नव्हतं याबद्दल. तर यानंतर मी तिच्यामागे गेले नाही तर त्या माणसाच्या मागे धावत गेली आणि त्याला चिमटे काढले, गुद्दे घातले आणि सरळ पोलिस ठाण्यात घेऊन गेले. इतकं सगळं करून आले होते; मी या गोष्टी सहन करत नाही.”