Pinga Ga Pori Pinga Serial 300 Episodes Celebration Video : ‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही मालिका. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मालिकेतील मैत्रिणींचा खास बॉण्ड प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतून पाच जीवाभावाच्या मैत्रिणींची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मैत्रिणींचं खास नातं या मालिकेतून प्रेक्षक अनुभवत आहेत.
मालिकेतील कलाकारांचा हाच खास बॉण्ड प्रत्यक्षातही आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतील सगळ्याच अभिनेत्री खऱ्या आयुष्यातससुद्धा एकमेकींच्या तितक्याच खास मैत्रिणी आहेत. अशा या मैत्रीवर आधारित ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेनं ३०० भागांचा टप्पा पार केला आहे.
‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचे ३०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ अभिनेत्री कांची शिंदेनं तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेचं नाव लिहिलेला मोठा केक पाहायला मिळत आहे. तसंच सगळे कलाकार या खास सेलिब्रेशनच्या वेळी उपस्थित होते. कलर्स मराठीवर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ आणि ‘इंद्रायणी’ या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही मालिकांतील कलाकार या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.
‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत अण्णा केदार प्रेरणाचे अपहरण करतो आणि त्यामुळे ‘पिंगा गर्ल्स’ खचून जातात. या संकटात नक्की काय करावं हे त्यांना समजेनासं झालं आहे. त्यामुळे ‘पिंगा गर्ल्स’ प्रेरणाचा शोध कसा घेणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
दुसरीकडे इंदूच्या शाळेचं स्वप्न साकारण्यासाठी ती अधूबरोबर मुंबईला येणार आहे. कारण- ती तिला तिचं स्वप्न पूर्ण करण्यात मदत करणार आहे. या महासंगमासाठी सलग दिवस-रात्र एक करून आठ दिवसांचं शूटिंग करण्यात आलं.
दरम्यान, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत ऐश्वर्या शेटे, आकांक्षा गाडे, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब व विदिशा म्हसकर या अभिनेत्री प्रमुख भूमिकांत आहेत. ‘इंद्रायणी’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेच्या महासंगम ६ ते ११ ऑक्टोबर, संध्याकाली ७ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.