अभिनेत्री राखी सावंत हे सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असलेलं नाव होय. ती तिच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्य व ड्रामेबाजीमुळे चर्चेत असते. राखी सावंतने आदिल खान दुर्रानीशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला होता. इस्लाम धर्म स्वीकारून फातिमा बनलेली राखी सध्या रमझानचे रोजे ठेवत आहेत. अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. या महिन्यात मुस्लीम रोजे ठेवतात आणि प्रार्थना करतात. राखीनेही नमाज पठण करतानाचे आणि इफ्तार पार्टीचे काही व्हिडीओ शेअर केले होते. अशातच तिने आणखी एक व्हिडीओ शेअर केला, ज्यानंतर तिच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. राखीने शेअर केलेल्या व्हिडीओत ती लूक चेंज करताना दिसत आहे.
व्हिडीओत राखीने बुरखा घातलेला दिसत आहे. त्यानंतर ‘मी माझ्या खऱ्या रुपात येऊ क असं राखी म्हणते आणि तिचा लूक बदलतो. दुसऱ्या लूकमध्ये ती लाल रंगाच्या बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. ‘इस्लामची मस्करी करू नकोस’, ‘आदिलने तुझी फसवणूक केली, तेव्हा तुझ्यासाठी वाईट वाटत होतं, पण तुझे असे व्हिडीओ पाहिले की त्याने जे केलं होतं, ते बरोबरच होतं,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.
‘प्लिज, इस्लामच्या पेहरावाचा तमाशा बनवू नकोस, नाहीतर तुझा जितका अपमान झाला आहे, तू त्याच लायकीची होतीस, असं आम्ही समजू’, असं एका युजरने म्हटलंय. ‘राखी हे काय आहे? तू आमच्या इस्लामचा अपमान करत आहेस. जर तू इस्लाम स्वीकारला असेल तर त्या धर्माचं नीट पालन कर. हा विनोद नाहीये, रमझानमध्ये तू असे कृत्य करत आहेस, तू आधी आम्हाला आवडायचीस पण आता लोक तुझा द्वेष करू लागले आहेत,’ अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
दरम्यान, राखी सावंत गेले काही महिने तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत होती. तिने आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं होतं, पण ते लपवून ठेवलं होतं. तिच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर काही दिवसांतच तिचा पतीशी वाद झाला आणि तिने तक्रार दिल्यानंतर आदिलला पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या तुरुंगात आहे.