Ratris Khel Chale 2 Fame Actress Boy Naming Ceremony : झी मराठीवरील काही गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका. लोकप्रियतेमुळे मालिकेचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं आहे. आता मालिका संपून इतके दिवस झाले असले तरीही त्या मालिकेची आणि कलाकारांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.

‘रात्रीस खेळ चाले’मधील कलाकार सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक अपडेट शेअर करीत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीने आई झाल्याची गुड न्यूज सांगितली होती.

अभिनेत्री मंगल राणेने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील आई आणि तान्ह्या बाळाबरोबरचा गोड फोटो शेअर करीत आई झाल्याची खुशखबर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती. ३ ऑगस्ट रोजी मंगलला पुत्ररत्न प्राप्त झालं असून, महिनाभरानंतर मंगलनं ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

अशातच आता मंगलनं लाडक्या लेकाचं बारसं केलं आहे आणि याचे काही खास क्षण तिनं सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. मंगलनं सोशल मीडियावर नामकरण सोहळ्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिच्या नवऱ्यानं बाळाला हातात घेतलं असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच मंगल आणि तिचा नवरा दोघे आपल्या बाळाकडे आनंदानं पाहत असल्याचे या फोटोमधून दिसत आहे.

मित्र-मैत्रीण, जवळचे नातेवाईक अशा मोजक्या लोकांत हा नामकरण सोहळा पार पडला असून, मंगलनं बाळाचं नाव ‘निहार’, असं ठेवलं आहे. तसंच आपल्या बाळाबरोबरचे खास फोटो शेअर करीत “आम्ही आमच्या छोट्या बाळाची ओळख जगाला प्रेमानं आणि अभिमानानं करून देत आहोत” असं म्हटलं आहे. दरम्यान, मंगलनं शेअर केलेल्या या फोटोवर कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट्स करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

मंगल राणे इन्स्टाग्राम पोस्ट

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये मंगलनं फोटोग्राफर असलेल्या संतोष पेडणेकरबरोबर लग्न केलं. जून महिन्यात मंगलचा डोहाळजेवणाचा (Baby Shower) कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आता तिनं आपल्या लेकाचं बारसं केलं आहे.

मंगलनं ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेबरोबरच इतर मालिकांमधूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मंगल ‘गाव गाता गजाली’, ‘रात्रीस खेळ चाले २’, ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ व ‘संत गजानन शेगावीचे’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.