Rutuja Bagwe Post About Thane Ghodbunder Road Condition : मुंबईतल्या रस्त्यांची दुरावस्था ही गेली अनेक वर्षे तशीच आहे. पावसाळा असो वा नसो, वाहनचालकांना आणि सामान्य नागरिकांना या खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागतो. विशेषतः ठाणे-घोडबंदर रोडची स्थिती इतकी वाईट आहे की, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकच नव्हे, तर अनेक सेलिब्रिटीसुद्धा वैतागले आहेत.
अनेक मराठी कलाकारांनी या रस्त्याबाबत तक्रारी व्यक्त केल्या आहेत. अभिनेता आस्ताद काळे, मिलिंद फाटक, अभिनेत्री सुरभी भावे यांसह अनेक कलाकारांनी वेळोवेळी आपल्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत. संताप व्यक्त करण्याबरोबरच रस्त्यांच्या या दुरवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंतीसुद्धा अनेकदा केली आहे.
अशातच आता आणखी एका अभिनेत्रीने या खड्ड्यांबाबत खोचक पोस्ट शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे, ऋतुजा बागवे. ऋतुजा बागवे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. तसंच कामानिमित्तची माहितीसुद्धा शेअर करीत असते.
ऋतुजाने ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांची भीषण परिस्थिती दाखवणारा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे आणि “अत्यंत सुंदर रस्ता घोडबंदर रोड” असं खोचकपणे म्हटलं आहे. शिवाय या व्हिडीओवर ऋतुजाने प्रताप सरनाईक यांचा उल्लेख करीत “पाठीचा मणका अजून शाबूत आहे, म्हणून साष्टांग नमन” असंही लिहिलं आहे.
दरम्यान, ऋतुजा मराठीसह हिंदी टीव्ही क्षेत्रातली लोकप्रिय अभिनेत्री आहे. ऋतुजाने ‘स्वामिनी’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘तू माझा सांगाती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती हिंदी टेलिव्हिजनद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘माटी से बंधी डोर’ मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. यासह तिने काही सिनेमांतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
अभिनेत्री म्हणून ओळख मिळवल्यानंतर ऋतुजाने ‘बिझनेस वुमन’ म्हणून आपला एक नवा प्रवास सुरू केला आहे. ऋतुजाने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत एक नवीन सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने अंधेरी पूर्व परिसरात स्वत:चं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. ऋतुजाच्या या रेस्टॉरंटचं नाव ‘फूडचं पाऊल’ असं आहे.