भोजपुरी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस २’ फेम संभावना सेठ नेहमीच चर्चेत असते. संभावनाने तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. २०१६ मध्ये संभावनाने अभिनेता अविनाश मिश्राबरोबर लग्न केले. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर २०२४ मध्ये संभावना पहिल्यांदाच आई होणार असल्याची खुशखबर दिली. पण दुर्दैवाने प्रेग्नन्सीमधील अडचणींमुळे तिचा गर्भपात झाला.

लग्नाच्या नऊ वर्षांनी गरोदर राहिलेल्या संभावनाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण गर्भपातामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या गर्भपातासाठी संभावनाने डॉक्टरांना जबाबदार धरलं आहे. संभावनाने हिंदी रशशी संवाद साधला. यावेळी तिने तिच्या गर्भपाताबद्दल सांगितले. याबद्दल संभावना म्हणाली, “मी माझ्या मुलाबद्दल खूप उत्साहित होती. माझा बेबी बंपही दिसू लागला होता. एवढेच नाही तर मी एक फोटोशूटही केले.”

यानंतर संभावना म्हणाली, “तिसऱ्या महिन्यात मी गरोदरपणाची घोषणा करणार होते. पण मला माहित नव्हते की, गर्भपात होईल. मी जेव्हा डॉक्टरांना सांगितले की, मला खूप वेदना होत आहेत, तेव्हा डॉक्टरांनी माझी तपासणी केली नाही. तुम्ही गर्भ हस्तांतरित करता, त्यापूर्वी एक चाचणी केली जाते. ती त्यांनी केलीच नाही आणि ते मूल अॅबनॉर्मल होते. जर मला हे पाचव्या महिन्यात कळले असते तर काय झाले असते याची कल्पना करा.”

पुढे संभावना म्हणाली, “तिसऱ्या महिन्यात मला माझं गर्भपात झाल्याचे कळलं. स्कॅनदरम्यान मला दिसून आले की, मी माझं बाळ १५ दिवसांपूर्वीच गमावलं आहे. मला माझ्या बाळाच्या मृत्यूची काहीच कल्पना नव्हती. मी १५ दिवस माझ्या शरीरात विष घेऊन फिरत होते. याबद्दल डॉक्टरांनी अजिबात सहानुभूती दाखवली नाही. ते फक्त ‘दुर्देवी’ म्हटले आणि निघून गेले.” संभावनाने याबद्दलचा व्लॉग व्हिडीओही शेअर केला होता.

यामध्ये अविनाशने म्हटलं होतं की, “काही वर्षांपासून आम्ही आयव्हीएफ ट्रीटमेंटद्वारे प्रेग्नंसीचा प्रयत्न करत होतो; तरी आम्हाला यश मिळत नव्हतं. यावर्षी संभावना गरोदर राहिली. तीन महिनेही पूर्ण झाले, मात्र तिचा गर्भपात झाला. आम्ही बाळासाठी बरीच तयारी करत होतो. संभावनाची आम्ही खूप काळजी घेत होतो. मात्र देवाच्याच मनात नसावं. डॉक्टरांनी अगदी जुळे होऊ शकतात असंही सांगितलं होतं. आम्ही खूप खूश होतो. मला संभावनासाठी खूप वाईट वाटत आहे.”

तर या व्हिडीओमधून संभावनाने असं म्हटलेलं की, “या संपूर्ण प्रक्रियेत मी जवळजवळ ६५ इंजेक्शन्स घेतले. हे सगळं खूप वेदनादायी होतं; याचा मला खूप त्रास झाला. मला आराम करायला सांगितलं होतं. पण हे सगळं मी बाळासाठी आनंदाने केलं. जेव्हा मला वाटलं की, इंजेक्शन्स आता बंद होतील. पण मला माहीत नव्हतं की, हे सगळं कायमचं थांबेल. दरम्यान, लग्नाच्या नऊ वर्षांनी संभावना आणि अविनाश हे दोघे आई-बाबा होणार होते.