‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर आणि ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री समृद्धी केळकर हे दोघंही अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांनी एकत्र ‘दोन कटिंग’ या सीरिजमध्ये काम देखील केलेलं आहे. आज जिवलग मित्राच्या वाढदिवसानिमित्त समृद्धीने सुंदर पोस्ट लिहित अक्षयला शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समृद्धीने अक्षयला एक खास प्रॉमिस केलं आहे… ते प्रॉमिस आहे डान्स प्रशिक्षणाचं. समृद्धीने अक्षयचं वाढदिवसानिमित्त कौतुक केल्यावर शेवटी “या वर्षी मी नक्की तुला डान्स शिकवणार…” असं म्हटलं आहे.

यावर अक्षय केळकर उत्तर देत म्हणतो, “बाकी शेवटचं प्रॉमिस या जन्मात तुला शक्य नाही. ओळखतो गं मी तुला…तुला वाटत नसलं तरी…” यापुढे अभिनेत्याने हसण्याचे इमोजी जोडले आहेत. समृद्धीने मित्राचं कौतुक करत नेमकं काय लिहिलंय पाहुयात…

समृद्धी केळकरने अक्षयला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

आपलं नातं खरंतर आपल्यालाच माहीत कारण, लोकांनी आपल्याला कलाकार म्हणून ओळखण्याआधी आपण एकमेकांना ओळखतो. काय कसं केव्हा याची उत्तरं काही महत्वाची नाहीत, महत्वाचं काय आहे ती म्हणजे आपली मैत्री. जी आधीही होती, आजही आहे आणि कायम असणार आहे. अभिनय क्षेत्रातली माझ्या आयुष्यातली पहिली ऑडिशनही तू म्हणालास म्हणून दिलेली आणि त्याच Audition आणि मालिकेमुळे मला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. तेव्हापासून आजवर पुन्हा कधी मागे फिरायचा विचार केला नाही आणि जेव्हा कधी तो आला तेव्हा माझ्या आधी तू त्याला पळवून लावलंस.

मित्र कितीही प्रेमळ असला, तरीही तो कर्तृत्ववान असला तर अभिमान थोडा जास्त असतो… तू आजवर हिंदी सिरियल्स, बिग बॉस, मराठी सिरियल, चित्रपट असं बरंच कमाल-कमाल काम केलं आहेस. पण त्याहूनही बऱ्याच जणांना जे जमत नाही असं मुंबईत स्वतःचं घर, गाडी एकूण सगळंच करून मोकळा झाला आहेस याचा तुझी जवळची हक्काची मैत्रीण म्हणून प्रचंड अभिमान वाटतो.

लोकांना तू इंडस्ट्रीत कसा आहेस, पर्सनल लाईफमध्ये कसा आहेस वगैरे काहीही, कसंही वाटू दे… आम्हाला माहीत आहे… अक्षय केळकर कसा आहे… शिवराळ असलास तरी माझ्या बाबांनंतर मला समजून घेणारा, मला माझ्यापेक्षा जास्त ओळखणारा, M Just A Call Away या वाक्याला प्रत्येक वेळी खरं ठरवणारा, काळजी घेणारा माणूस, मित्र अजून कोणी भेटला नाही. एवढ्या वर्षांची ओळख पण खूप कमी काम एकत्र केलं… येणाऱ्या वर्षांत बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम करूच. आता लवकरच तुझा नवीन चित्रपट येतोय त्यासाठी तुला भरभरून शुभेच्छा… आणि ह्या सगळ्याबरोबर वाढणाऱ्या वयाची आठवण करून देणाऱ्या तुझ्या वाढदिवसाच्या ही तुला अनंत शुभेच्छा!!

(या वर्षी मी नक्की तुला Dance शिकवणार… Promise )
बाकी तू कमाल आहेस आणि कायम तसाच कमाल राहा! खूपप्रेम

दरम्यान, समृद्धीच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अशी निखळ मैत्री आजकाल फार दुर्मिळ झाली आहे तुमची मैत्री अशीच कायम राहो हीच शुभेच्छा!”, “तुमच्या मैत्रीला कोणाचीच दृष्ट न लागो” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samruddhi kelkar shares special post for akshay kelkar on his birthday sva 00