Sulekha Talwalkar Lovestory : मराठी मालिकांमधून आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या सुलेखा तळवलकर सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. नुकतेच त्या आणि त्यांचे पती अंबर तळवलकर यांनी ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमात हजेरी लावली आणि आपल्या प्रेमकथेच्या खास आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या.

सुलेखा आणि अंबर यांची ओळख लहानपणापासूनची. अंबर यांनी फक्त १७ व्या वर्षी सुलेखाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, हे त्यांनी कार्यक्रमात सांगितलं. अंबर म्हणाले, “मी तिला पहिल्यांदा प्रपोज केलं, तेव्हा तिनं मला ६-७ महिने वाट पाहायला लावली.”
त्यावर हसत सुलेखा म्हणाल्या, “असंच झालं; पण मुद्दाम नाही केलं. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो.”

पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच आवडली होती : अंबर तळवलकर

अंबर पुढे म्हणाले, “मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ती मला आवडली होती.” त्यावर सुलेखा म्हणाल्या, “मला मात्र असं वाटलं होतं की, हा टाइमपास करतोय; पण जसजशी मैत्री वाढली, तसतसं कळलं की, हा खरंच गंभीर आहे.”

त्यांच्या प्रेमकथेतील एक खास किस्सा शेअर करीत सुलेखा पुढे म्हणाल्या, “एकदा त्याची आई – स्मिता तळवलकर – बॉस्टनला दौऱ्यावर गेल्या असताना अंबरनं त्यांना फोन करून सांगितलं की, मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय आणि तिच्याशी लग्न करणार आहे; पण त्यांची जी प्रतिक्रिया होती, ती अंबर आज टेलिव्हिजनवर सांगू शकत नाही.”

पुढे कार्यक्रमात सुलेखा यांना त्यांचा पहिला चित्रपट ‘माझी आई’चं पोस्टर दाखवण्यात आलं. त्या आठवणींविषयी त्या म्हणाल्या, “या चित्रपटात मी आणि मेधा मांजरेकर आम्ही दोघींनी एकत्र काम केलं होतं. मेधावहिनी अंबरच्या नातेवाईक आहेत. त्यामुळे अंबर त्यांना सेटवर सोडायला यायचा, घ्यायला यायचा आणि नंतर तिथेच थांबायचा. मला वाटायचं की, यांच्यामध्ये किती प्रेम आहे; पण नंतर कळलं की, हे सगळं माझ्यासाठीच होतं. अखेरीस मेधावहिनींच आमचं लग्न जमलं.”

त्या काळात मोबाईल फोन नवीन होते आणि सुलेखा पेजर वापरत असत. अंबर यांनी तेव्हाचा एक गमतीशीर सांगत म्हणाले, “मी तिला पेज केलं की, तिला फोन करायला सेटपासून खूप लांब जावं लागायचं. शेवटी वैतागून मीच तिला एक महागडा मोबाईल फोन गिफ्ट केला.”