Savita Prabhune on Sushant Singh Rajput and Priya Marathe: ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खूप मोठ्या प्रमाणात गाजली. २००९ ते २०१४ या दरम्यान या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मालिकेतील अर्चना, मानव, सविता, अर्चना, वैशाली, सुचोलना अशी सगळीच पात्रे मोठ्या प्रमाणात गाजली.

आता मालिकेला संपूर्ण १० वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, आजही या मालिकेबाबत बोलले जाते. आजही या मालिकेतील पात्रांची चर्चा होताना दिसते. या मालिकेत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मानव ही भूमिका साकारली होती; तर अभिनेत्री प्रिया मराठेने अर्चना ही भूमिका साकारली होती. या दोन्ही कलाकारांचे कमी वयात निधन झाले आहे. १४ जून २०२० ला सुशांत सिंह राजपूतचे निधन झाले; तर ३१ ऑगस्ट २०२५ ला प्रिया मराठेचे निधन झाले.

“मला या बाबतीत किती वाईट वाटलं आहे ते…”

आता ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी यावर वक्तव्य केले. त्यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सविता प्रभुणे म्हणाल्या, “मला खूप त्रास झाला. मध्यंतरी कोणीतरी अशी प्रतिक्रिया दिली होती की, यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण, माझं सोशल मीडिया अकाउंट पाहिलं असेल तर मी कुठल्याच बाबतीत व्यक्त होत नाही. कारण- मला असं वाटतं की, व्यक्त होण्यापेक्षा मला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना माहीत आहे की, मला या बाबतीत किती वाईट वाटलं आहे किंवा हे लोक माझ्या किती जवळचे होते.”

“सुशांतसुद्धा माझ्या जवळचा होता. तीन वर्षं सलग काम केलं होतं आणि आम्ही दिवस-रात्र एकत्र काम करीत होतो. तो मुलगा खूप गोड होता. कामाच्या बाबतीत तो शिस्तप्रिय होता. मन लावून काम करायचा. त्यामुळे हा मुलगा पुढे यशस्वी होणार, हे माहीत होतं. तसेच झालं, तीन वर्षं मालिकेत काम केल्यानंतर तो चित्रपटात काम करू लागला. त्यानं चित्रपटात काम करणं सुरू केल्यानंतर आमचा संपर्क कमी झाला; पण त्याच्याबद्दल कौतुक होतं.

“प्रिया तर खूप जवळची होती इतकी ती गोड मुलगी होती. होती म्हणणंसुद्धा मला जड जात आहे. ती हसरी, खेळकर होती. आम्ही मजा करायचो. ‘पवित्रा रिश्ता’नंतर आम्ही ‘साथ दे तू मला’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. दीड वर्षापूर्वी मी तिचं परफेक्ट मर्डर हे नाटक पाहायला गेले होते. असं व्हायला नको होतं. चटका लावून जाणं म्हणतो ना तसं झालं आहे. तिच्या आजारपणाबद्दल खूप उशिरा समजलं. आम्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. सगळ्या आमच्या ग्रुपलाच वाईट वाटलं. “

‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर सर्वांत जास्त वेळ घालवला. त्यामुळे कलाकारांच्या घरचे लोक सेटवर भेटायला यायचे. त्यांच्याशीसुद्धा ओळख झाली होती. मालिकेत मराठी वातावरण होतं आणि मालिकेत काम करणारे आम्ही बरेच जण मराठी होतो. त्यामुळे खूप जवळीक निर्माण झाली होती, असेही सविता प्रभुणे म्हणाल्या.