Nilesh Sabale & Sharad Upadhye : डॉ. निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या सोशल मीडिया पोस्टची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा शो लवकरच पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि यंदा या शोचं सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर करणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद उपाध्ये यांनी पोस्ट शेअर करत निलेश साबळेवर टीका केली होती.
निलेश साबळेने सेटवर अपमानास्पद वागणूक दिली, स्माइलही दिलं नाही, त्याच्या डोक्यात हवा गेली होती असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर अखेर डॉ. निलेश साबळेने सविस्तर व्हिडीओ शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. शरद उपाध्ये सर माझ्यासाठी गुरुतुल्य आहेत, त्यामुळे त्यांनी कोणत्याही गोष्टीची पूर्व माहिती घेऊन मग जबाबदारीने पोस्ट लिहावी असं निलेश साबळेने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
तसेच शरद उपाध्ये यांनी ६ वर्षांपूर्वी देखील अशाचप्रकारे पोस्ट शेअर करत टीका केल्याचं निलेश साबळे या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्यांनी कारण नसताना पोस्टमध्ये ‘भंगारवाला’ असा उल्लेख केला होता असंही अभिनेत्याने सांगितलं आहे. निलेश साबळेने उल्लेख केलेली ही ६ वर्षांपूर्वीची पोस्ट नेमकी काय आहे पाहुयात…
शरद उपाध्ये यांनी ६ वर्षांपूर्वी केलेली पोस्ट…
भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे हे करोडोंच्या किंमतीचे कोहिनूर हिरे आहेत. पण, त्यांची पारख अस्सल रत्नपारख्यालाच होईल ना! जेव्हा असे हिरे भंगारवाल्याच्या दृष्टीस पडतात, तेव्हा त्याला ती काच वाटते आणि तो एखाद्या फुटाणेवाल्याला ती देऊन एक रुपयाचे फुटाणे विकत घेऊन खातो. खरा हिरा हा मौल्यवान पेटीत मखमलीच्या गादीवर ठेवायचा असतो पण भंगारवाला त्याला घाणेरड्या कागदाच्या पुडीत पुरचुंडी करतो आणि कचऱ्याच्या भावात विकतो. रत्नांचा परीक्षक जव्हेरीच त्यांची अस्सल किंमत जाणतो. दुर्दैवाने हे मौल्यवान हिरे कधी साडीत, कधी लुंगीत, कधी अर्ध्या चXX गुंडाळतात. फक्त फुटाणे मिळावेत म्हणून… कधीतरी त्यांना खूप आदर्श व्यक्तिमत्वाच्या भूमिकेत, चारित्र्यसंपन्न संतांच्या भूमिकेत, श्रेयाला एखाद्या तेजस्वी महाराणीच्या भूमिकेत सादर केले तर कसला कसदार अभिनय करतील हे हिरे! पण सतत वेडीवाकडी तोंडे, गलिच्छ मेकअप, अत्यंत हीन दर्जाचे पाचकळ विनोद, साड्या… आपल्याच वाहिनीवरच्या मालिकांचे विडंबन, आरडाओरडा, भाडोत्री प्रेक्षकांचे अशोभनीय अंगविक्षेप आणि हसणे, सुमार संदर्भहीन लेखन हे सारे पाहून विषण्ण वाटते. किती प्रतिभावान कलावंत खालच्या दर्जाला नेले जातात! सुसंस्कृतपणापेक्षा टीआरपी महत्वाचा ठरतोय खरा.
दरम्यान, निलेश साबळेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये का झळकणार नाहीये. याचं कारणही स्पष्ट केलं आहे. ‘झी मराठी’ वाहिनीकडून फोन आला होता. मात्र, सध्या सिनेमाचं शूटिंग आणि अन्य कामं असल्याने मी स्वत: या सीझनसाठी माघार घेतल्याचं अभिनेत्याचं सांगितलं आहे.