Shashank Ketkar Talks About His Son : अभिनेता शशांक केतकर ‘मुरांबा’ या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. ‘मुरांबा’ मालिकेने नुकताच सात वर्षांचा लिप घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता मालिकेच्या कथानकानुसार त्यामध्ये एका बालकलाकाराची एन्ट्री झाली आहे. अशातच आता शशांकनं मालिकेतील लेकीबद्दल व त्याच्या खऱ्या आयुष्यातील मुलाबद्दल सांगितलं आहे.

‘मुरांबा’ मालिकेत सात वर्षांच्या लिपनंतर आता रमा व अक्षय यांची मुलगी मोठी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये बालकलाकार आरंभी उबाळे त्यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. शशांक केतकर, शिवानी मुंढेकर व आरंभी या तिघांनी नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये शशांकने आरंभीबरोबरचे सीन पाहिल्यानंतर त्याच्या मुलाला ऋग्वेदला राग येतो, असं म्हटलं आहे.

शशांक केतकरच्या मुलाची प्रतिक्रिया

मुलाखतीमध्ये शशांकला त्याची मुलगी राधा व मुलगा ऋग्वेदबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावर तो म्हणाला, “ऋग्वेदला अजिबात आवडत नाही, मी दुसऱ्या कोणालाही कडेवर घेतलेलं. त्यामुळे तो मला ताकीद देऊनच पाठवतो रोज. तो म्हणतो की, त्या मुलीशी बोलायचं नाही. तिचे लाड करायचे नाहीत. तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की, ते सगळं खोटं खोटं असतं. पण, आरंभीबरोबरचे सीन आणि प्रोमो पाहिले की, तो खूप नाराज होतो.”

शशांक पुढे म्हणाला, “त्यामुळे मी प्रियांकाला सांगून ठेवलंय की, तो असताना मालिका लावूच नको. त्याला त्यातलं काही दाखवू नकोस. कारण- परत त्याला समजावण्यात खूप वेळ जातो. अर्थात, तो लहान असल्यानं त्याला हे सगळं खरं वाटतं. एक तर मी त्याला भेटतच नाही. सकाळी तो उठल्यानंतर फक्त त्याला उठवतो त्यानंतर त्याचं सगळं आवरायचं आणि शाळेत सोडायचं एवढंच. नंतर मी घरी पोहचेपर्यंत तर तो झोपलेला असतो. त्यामुळे आमची भेटच होत नाही. त्यामुळे जेव्हा तो मालिकेतील हे सीन बघतो तेव्हा तो मग रडतोच.”

दरम्यान, ‘मुरांबा’ मालिका तीन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. १४ फेब्रुवारी रोजी ही मालिका प्रदर्शित झाली होती. आता मालिकेला प्रदर्शित होऊन तीन वर्षं उलटून गेली आहेत. त्याशिवाय मालिकेनं एक हजार भागांचा टप्पासुद्धा पार केला आहे. अशातच आता मालिकेनं सात वर्षांचा लिप घेतल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे रमा व अक्षय यांच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं आहे.