Actor Yogesh Mahajan Passed Away: टीव्ही इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी व हिंदी टीव्ही मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मराठमोळे अभिनेते योगेश महाजन यांचे निधन झाले आहे. योगेश महाजन यांनी ५० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगेश महाजन ‘शिव शक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेचं उमरगावमध्ये शूटिंग करत होते. या मालिकेत ते शुक्राचार्य हे पात्र साकारत होते. शनिवारी संध्याकाळी शूटिंग संपवल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होतं, ते डॅाक्टरांकडे गेले आणि औषधं घेतली; नंतर हॅाटेलमधील त्यांच्या खोलीत झोपले. पण ते रविवारी सेटवर आले नव्हते, त्यामुळे मालिकेच्या टीममधील लोकांनी त्यांना फोन केले, मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

योगेश यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने टीममधील काही लोक ते थांबलेल्या हॅाटेलमध्ये गेले. तिथे दरवाजा तोडून आत गेल्यावर ते बेडवरून खाली पडले होते. खोलीतच त्यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

योगेश महाजन यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी माहिती दिली आहे. योगेश महाजन यांचे रविवारी, १९ जानेवारी २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी हा एक मोठा धक्का आहे. त्यांच्यावर आज सोमवारी (२० जानेवारी) अंत्यसंस्कार केले जातील, असं कुटुंबियांनी सांगितलं.

गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे योगेश महाजन हे मूळचे जळगावचे होते. अभिनयाची आवड असल्याने ते या क्षेत्रात आले होते. भोजपुरी इंडस्ट्रीतून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या योगेश महाजन यांनी ‘मुंबईचे शहाणे’, ‘संसाराची माया’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv shakti tap tyag tandav fame marathi actor yogesh mahajan died of heart attack after shooting hrc