Shreya bugde Shared A Special Post On Kushal Badrike’s Birthday : अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या ‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वामुळे चर्चेत आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. अनेकदा यामार्फत ती तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच आज अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने तिचा सहकलाकार व मित्र अभिनेता कुशल बद्रिकेसाठी ही पोस्ट केली आहे.
कुशल बद्रिकेचा आज वाढदिवस आहे. कुशलने आजवर त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. तो फक्त पडद्यावरच नाही तर पडद्यामागेही त्याच्याबरोबर असलेल्या लोकांचं मनोरंजन करत असतो. अशातच आता त्याच्या वाढदिवसानिमित्त श्रेयाने खास पोस्ट करत त्याच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
श्रेयाने इन्स्टाग्रामवर कुशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटलं की, “भन्नाट आठवणींसाठी, असंख्य ट्रॅव्हल स्टोरीसाठी, मला हसवण्यासाठी धन्यवाद. मला मार्गदर्शक व मित्र म्हणून साथ दिल्याबद्दल आभार. तुझ्यासारखं जगात दुसरं कोणीही नाही. असाच राहा. समुद्रासारखा निखळ निरंतर वाहणारा, आभाळासारखा निस्सीम. सगळं सगळं व्यापून टाकणारा.”
श्रेयाने यावेळी कुशल बद्रिकेबरोबरच्या काही आठवणीसुद्धा फोटोंद्वारे शेअर केलेल्या तिच्या पोस्टमधून पाहायला मिळत आहेत. तसेच अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टखाली, अभिनेता अभिजीत खांडकेकरनेही कमेंट केली आहे. अभिजीत यावेळी ‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वामध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भरत गणेशपुरे, गौरव मोरे हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’ वाहिनीने या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची घोषणा केली होती. येत्या २६ जुलैपासून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वाहिनीने नवीन पर्वाची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता आहे. परंतु, यावेळी या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता निलेश साबळे पाहायला मिळणार नाही. त्याच्या जागी या पर्वात अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
दरम्यान, कुशल बद्रिकेबद्दल बोलायचं झालं तर त्याने आजवर एकापेक्षा एक भन्नाट स्कीटचं सादरीकरण करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला ते ‘चला हवा येऊ द्या’मुळे. यासह त्याने काही चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.