Muramba upcoming twist: रमा अक्षय ही जोडी कायमच चर्चेचा विषय ठरते. त्यांच्यातील भांडणे, दुरावा तरीही एकमेकांबद्दल वाटणारी काळजी, प्रेम सातत्याने लक्ष वेधून घेतात. रमा आणि अक्षय कायमच एकमेकांसाठी विविध गोष्टी करताना दिसतात. आता सात वर्षे एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत, पण अजूनही त्यांच्यातील गैरसमज दूर झालेले नाहीत.
‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
मुलगी आरोही त्यांना पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात आणण्यासाठी, त्यांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. मात्र, रमा आणि अक्षय यांच्यातील दुरावा अजूनही तसाच असल्याचे पाहायला मिळत आहे. आता ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, रमा चोराच्या मागे पळत आहे. पळताना ती माझी पर्स, चोर-चोर म्हणत असल्याचे दिसते. तितक्यात अक्षय धावत येतो. तो त्या चोराला, ए थांब असे ओरडत त्या चोराच्या मागे पळतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, त्या चोरामध्ये आणि अक्षयमध्ये मारामारी होते. तो चोर खिशातून चाकू काढतो आणि अक्षयच्या हातावर वार करतो. रमा त्याला म्हणते, “अहो पर्स जाऊ द्यायची ना, ती काय तुमच्या जीवापेक्षा महत्त्वाची आहे का?” त्यानंतर ती अक्षयचा हात हातात घेते आणि त्यावर एक कपडा बांधते.
रमा कपडा बांधत असतानाच अक्षय रागाने तिच्या हातातून त्याचा हात काढून घेतो आणि म्हणतो, “सोडा, बास झाली ही नाटकं, असं खोटं वागण्याची काही गरज नाही; एवढी काळजी वाटत होती तर घर सोडून जायचचं नाही.” त्यावर रमा म्हणते, “थांबवायच तेव्हा”, त्यावर अक्षय पुन्हा म्हणतो, “मी काय तुम्हाला थांबवणार? तुमच्यापुढे हात जोडतो. आयुष्यातून निघून गेला होता ना? पुन्हा का त्रास देताय? आधीच खूप जखमा दिल्या आहेत. त्या जखमा एकवेळ सहन करेन, पण खोटी मलमपट्टी नको”, असे म्हणून तो तिथून जाण्यासाठी उठतो.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “अक्षयच्या अशा बोलण्यामुळे रमा-अक्षयमधला दुरावा आणखी वाढेल का?”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, रमा आणि अक्षयमधील दुरावा कसा कमी होणार; इरावतीचे सत्य कधी समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.