Star Pravah Parivaar Puraskar 2025 : ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. मालिकाविश्वाक काम करणाऱ्या कलाकारांना आपल्या कामाची पोचपावती या पुरस्कार सोहळ्यांमधून मिळते. यंदा सोहळ्याचं पाचवं वर्ष असल्याने महाराष्ट्रभूषण अशोक सराफ, त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ, बॉलीवूड गाजवणारी ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, दिग्दर्शक महेश कोठारे असे बरेच मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच ‘स्टार प्रवाह’च्या एकूण १४ मालिकांमधले कलाकार, यापूर्वीच्या जुन्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार या सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
‘महाराष्ट्रभूषण’ अशोक सराफ यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना गेल्यावर्षी महाराष्ट्रभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्ताने ‘स्टार प्रवाह’च्या कलाकारांनी या ज्येष्ठ अभिनेत्याचा विशेष सन्मान केला.
मालिका असो, सिनेमा असो किंवा नाटक अशोक सराफ यांनी कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या ९० च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांवर ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी बहारदार परफॉर्मन्स सादर केला. यावेळी अशोक सराफ यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या आठवणींना या मंचावर उजाळा देऊन या महानायकाचा पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
सिद्धार्थ खिरीड, विजय आंदळकर, ज्ञानदा रामतीर्थकर, यशोमन आपटे, मधुरा देशपांडे, पालवी कदम, आदिश वैद्य, अभिजीत आमकर, शिवानी मुंढेकर, शर्वरी जोग, आकाश नलावडे, पालवी कदम हे कलाकार अशोक सराफ यांच्यासाठी खास परफॉर्मन्स सादर करणार आहेत. याशिवाय मंचावर त्यांचं औक्षण करण्यात येणार आहे. या सोहळ्याला त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ देखील उपस्थित होत्या.
अशोक सराफ यांचा सन्मान होताना पाहून निवेदिता भारावून गेल्या होत्या. आपल्या पतीचं कौतुक करताना त्या या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात येणार आहेत.
दरम्यान, यंदा या पुरस्काराच्या शर्यतीत ‘स्टार प्रवाह’च्या एकूण १४ मालिका आहेत. आता सोहळ्यात कोणती मालिका बाजी मारणार? यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व अभिनेता कोण ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd