Shubh Vivah Serial Promo : अभिनेता यशोमान आपटे व मधुरा देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेली ‘शुभ विवाह’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अशातच काही दिवसांपूर्वीच या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री झाली आहे. तिच्या येण्याने मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे.
अपूर्वा ‘शुभ विवाह’मध्ये अपूर्वा पुरोहित ही भूमिका साकारत आहे, त्यामुळे तिच्या येण्याने मालिकेत महाजनांच्या घरावर मोठं संकट येणार असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेत लवकरच अपूर्वा आणि बलदेव यांचं लग्न होणार आहे. अशातच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.
शुभ विवाह मालिकेचा प्रोमो
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडिया पेजवरून मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अपूर्वा व बलदेव यांचं लग्न झालेलं असून ती महाजन कुटुंबात प्रवेश करताना दिसते. समोर आलेल्या प्रोमोमध्ये अपूर्वा व बलदेव यांचं लग्न झालेलं पाहायला मिळत असून ते दोघे गृहप्रवेश करत असताना भूमी अपूर्वाला आता “उजव्या पायाच्या अंगठ्याने माप ओलांड आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात ये आणि अख्ख घर उजळून टाक” असं म्हणते.
अपूर्वा आणि बलदेव पुढे गृहप्रवेश करतात, पण तेवढ्यात घरातील सर्व लाईट्स बंद होतात. त्यानंतर अपूर्वा आणि भूमी मिळून देव्हाऱ्यातील दिवा लावतात आणि त्यावेळी भूमी तिला “अपूर्वा, तू आणि मी मिळून या घरावर येणारं प्रत्येक संकट परतवून लावूयात” असं म्हणते. त्यानंतर अपूर्वा मनातल्या मनात ही तर सुरुवात आहे भूमी, संकटांची खरी मालिका आता सुरू होईल असं म्हणताना दिसते.
प्रोमोमध्ये पुढे भूमी व आकाश खोलीत असताना तिथे एक साऊंड ठेवलेला असतो, ज्यामधून सात वर्षांपूर्वी तुमच्या हातून घडलेल्या गुन्ह्याची मी सक्षीदार आहे आणि आता तोच गुन्हा मी समोर आणणार; असं ऐकू येतं, जे ऐकून भूमी व आकाश यांचे हाव भाव बदलतात आणि त्यांना भीती वाटू लागते. १ नोव्हेंबर दुपारी अडीच वाजता हा भाग प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह’वर पाहाता येणार आहे.
