Tu He Re Maza Mitwa Upcoming Twist: मालिकामध्ये नवीन वळण आले, नवीन ट्विस्ट आले तर प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय होईल, याबद्दल उत्सुकता लागलेली असते. आपल्या आवडत्या मालिकेतील आवडत्या पात्राच्या आयुष्यात नेमकं काय होणार आहे, काय घडणार आहे, हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे असते.
गेल्या काही दिवसांपासून तू ही रे माझा मितवा मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या मालिकेत येणारे ट्विस्ट, अर्णव व ईश्वरी यांच्यातील मैत्री, केमिस्ट्री, त्यांच्यात झालेले गैरसमज, थोडे रुसवे-फुगवे, त्यांचे लग्न तसेच राकेशचे कारस्थान अशा अनेक गोष्टींमुळे आणि मालिकेतील विविध प्रसंगामुळे मालिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी ईश्वरीसमोर राकेशचा खरा चेहरा आला आहे. अंजलीचा नवरा राजेश आणि ईश्वरीवर प्रेम असल्याचे सांगणारा, तिला लग्नाची मागणी घालणारा राकेश हा एकच व्यक्ती आहे. हे जेव्हा ईश्वरीला समजले तेव्हा तिला मोठा धक्का बसला. त्यानंतर हळूहळू ईश्वरी व अर्णव यांच्यातील गैरसमज दूर होत असल्याचे दिसत आहेत. तसेच, त्यांच्यात पुन्हा एकदा मैत्री होताना दिसत आहे. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये राकेश व ईश्वरी पुन्हा समोरासमोर येणार असल्याचे दिसत आहे.
‘तू ही रे माझा मितवा’मध्ये मोठा ट्विस्ट
आता स्टार प्रवाह वाहिनीने ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की राकेश ईश्वरीला म्हणतो की घरी कोणीही नाही. फक्त मी आणि माझ्या.. असे तो म्हणत ईश्वरीला हात लावण्यासाठी पुढे करतो. ईश्वरी घाबरलेली दिसते. तितक्यात राकेशला कोणीतरी पाठीमागून पकडते. तो अर्णव असतो.
अर्णव राकेशला पाठीमागे ओढतो. त्याला पाहताच ईश्वरी त्याच्या मीठीत जाऊन रडते. तितक्यात राकेश त्यांच्या अंगावर धावून जातो. अर्णव त्याच्या गळ्याला पकडतो आणि संतापाने त्याला म्हणतो, “ती माझी बायको आहे. तुझ्यामुळे मिस इंदौरच्या डोळ्यांत यापुढे पाणी आलं तर पकडलेला गळा तुझा श्वास बंद झाल्याशिवाय सोडणार नाही.”
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “अर्णव देणार राकेशला त्याच्या वागणुकीचे सडेतोड उत्तर”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच अर्णव व ईश्वरीचे लग्न झाले होते. या लग्नामुळे ईश्वरी आनंदी नाही. तिचा अर्णववर राग होता.अर्णवने तिच्या वडिलांचा अपघात घडवून आणला असे तिला वाटत होते. पण, हा अपघात राकेशने घडवून आणला. पण गाडी अर्णवची वापरली. त्यामुळे ईश्वरीचा मोठा गैरसमज झाला होता. आता मात्र मालिकेत नवनवीन गोष्टी घडताना दिसत आहे.
दरम्यान, मालिकेत नेमके काय घडणार, राकेशचा खरा चेहरा सर्वांसमोर कधी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.