Tu Hi Re Maza Mitwa Serial New Promo : स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ ही नव्यानं सुरू झालेली मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करीत आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट, अर्णव-ईश्वरीची केमिस्ट्री आणि उत्तम कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. हटके कथानकामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीत आपलं स्थान टिकवून आहे. मालिकेत पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली असते.

मालिकेत काही दिवसांपूर्वीच अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालं. मनाविरुद्ध लग्न झाल्यानं ईश्वरी सुरुवातीला अर्णववर रागावली होती. मात्र, राकेशपासून वाचवण्यासाठी अर्णवने आपल्याबरोबर लग्न केल्याचं ईश्वरीला कळलं तेव्हापासून त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आहे आणि ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलत आहे. अर्णव आणि ईश्वरी या दोघांमधील प्रेमाच्या नात्याला सुरुवात झाली आहे.

अर्णवचं ईश्वरीबरोबर लग्न झाल्याने लावण्याचा अर्णवची बायको म्हणून राजेशिर्के कुटुंबात सून म्हणून बनून जाण्याचा प्लॅन चांगलाच फसला आहे, त्यामुळे ती संधी मिळेल तेव्हा अर्णवशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते. अशातच एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये लावण्या अर्णवच्या कॉफीमध्ये गुंगी येणारं औषध मिसळते, त्यामुळे अर्णवला गुंगी येते आणि त्याच्या याच परिस्थितीचा फायदा घेत लावण्या अर्णवशी जवळीक करून त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते.

लावण्याचा हा प्लॅन यशस्वी होणार इतक्यात ईश्वरी तिथे पोहोचते आणि ती अर्णवला लावण्यापासून दूर करते. इतकंच नव्हे, तर ईश्वरी लावण्याच्या कानाखाली मारते आणि तिला कठोर शब्दांत सुनावते की, “माझा नवरा फक्त माझा आहे, बायकोसमोर बाहेरच्या बाईने संधीसाधूपणा केला तर कानाखाली असाच आवाज निघणार.” मालिकेचा हा भाग येत्या १९ नोव्हेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे. तसंच हा नवा ट्विस्ट अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या प्रोमोखाली प्रेक्षकांनी तशा प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केल्या आहेत.

‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेचा प्रोमो

दरम्यान, मालिकेत नुकताच अर्णवचा आवाज गेला असल्याचं पाहायला मिळालं. पण, नवऱ्याचा आवाज गेला असतानाही ईश्वरीनं अर्णवतर्फे प्रेझेंटेशन सादर केलं आणि एक महत्त्वाची डील मिळवून दिली, यामुळे राजेशिर्के कुटुंबातील सर्वांनीच तिचं कौतुक केलं.

यामुळे लावण्याला मात्र प्रचंड राग आला आहे; त्यात आता ईश्वरीनं तिचा प्लॅनही उद्ध्वस्त केला आहे, त्यामुळे आता या रागाचा लावण्या कसा बदला घेणार? हे मालिकेच्या आगामी भागांतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.