Subodh Bhave Praises Shantanu Moghe : प्रिया मराठे व शंतनू मोघे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडींपैकी एक होते. परंतु, काही दिवसांपूर्वी प्रियाचं निधन झालं आणि शंतनू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रियाच्या कठीण काळात त्यांनी तिला खंबीर साथ दिली, यामुळे अनेक कलाकार मंडळींनी शंतून यांचं कौतुकही केलं. अशातच आता सुबोध भावेनेही प्रिया व शंतनू यांच्याबद्दल सांगितलं आहे.

सुबोधने प्रिया व शंतनू यांच्याबरोबरच्या आठवणी सांगितल्या आहेत. यावेळी त्याने प्रिया व शंतनू यांचं लग्न कसं जुळलं त्याबद्दलही सांगितलं आहे. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सुबोधला प्रिया आणि शंतनू यांच्या नात्याबद्दल तुझ्याकडून ऐकायला आवडेल असं विचारण्यात आलेलं. यावर तो म्हणाला, “मला आठवतं, जेव्हा प्रियाने शंतनूला पसंत केलेलं, तेव्हा आमच्याच घरी काकू आणि माझे आई-बाबा तिच्या लग्नाबद्दल बोलत होते.”

सुबोध भावेने केलं शंतनू मोघेंचं कौतुक

सुबोध पुढे म्हणाला, “शंतनूही याच क्षेत्रात असल्याने कसं होईल, हे क्षेत्र खूप अनिश्चित आहे, याबद्दल काकूच्या मनात काळजी होती. पण मला असं वाटतं, त्या दोघांचं एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं आणि शंतनूसारखा नवरा तिला जोडीदार म्हणून मिळाला. मला असं वाटतं की खूप केलं त्या मुलाने, इतकं कोणी करत नाही. आताच्या काळामध्ये जेव्हा आपण लोकांचे दोन-तीन महिन्यातच घटस्फोट होतात आणि त्यांना विभक्त होताना बघतो; अशा काळात या आजारपणात तो ज्या ठामपणे तिच्याबरोबर उभा राहिला ते कौतुकास्पद आहे.”

सुबोध शंतनू यांचं कौतुक करत पुढे म्हणाला, “प्रियाचं तर कौतुक आहेच, पण शंतनूचंही कौतुक आहे की, त्याने स्वत:चं काम सोडून त्याच्या आयुष्यातला संपूर्ण वेळ तिला दिला. शंतनूने काम सोडलं होतं आणि आता अगदी जायच्या दिवशी, जे त्याने नवीन काम केलेलं त्याचा पहिला एपिसोड आलेला आणि तो प्रियाने पाहिला होता आदल्या रात्री. वेड्यासारखं प्रेम केलं त्यांनी एकमेकांवर. मला शंतनूचा खरंच खूप अभिमान आहे.”