Anupama Fame Actor Slams Ram Kapoor : प्रसिद्ध अभिनेते राम कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राम कपूर यांनी त्यांच्या ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ते चर्चेत आले. परंतु, यावेळी त्यांच्यावर टीकासुद्धा झाली. मालिकेची निर्माती एकता कपूरनेदेखील सोशल मीडियामार्फत त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
राम कपूर यांनी यानंतर त्यांच्या ‘मिस्त्री’ या सीरिजबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलं, ज्यानंतर त्यांना या सीरिजच्या प्रमोशनमधून वगळण्यात आलं. राम कपूर यांनी ‘मिस्त्री’ या सीरिजच्या मार्केटिंग टीममधील सदस्यांबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्यानंतर त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. अशातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याने राम कपूर यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यांनी राम कपूर मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं म्हटलं आहे. ‘अनुपमा’ फेम अभिनेते सुधांशू पांडे यांनी ‘फिल्मी बीट’शी संवाद साधताना राम कपूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुधांशू पांडे म्हणाले, “राम कपूर स्वत: त्याचं नाव खराब करत आहे. मला असं वाटतं, मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली व्यक्ती असं वक्तव्य करू शकते. विशेष करून जेव्हा तुम्ही स्त्रियांबद्दल वक्तव्य करता, ज्या तुमच्याबरोबर काम करत आहेत; अशावेळी तुम्हाला त्याचं भान असणं गरजेचं आहे. कुठल्याही माणसाने आपण काय बोलत आहोत याची जाणीव ठेवून बोलावं, विशेष करून स्त्रियांबाबत कुठलीही मतं व्यक्त करताना तुम्ही त्यांचा आदर ठेवून वक्तव्य करावं.”
सुधांशू पुढे म्हणाले, “त्यांच्या वतीने मी सर्व स्त्रियांची माफी मागतो. रामने जे केलं आहे ते खूप चुकीचं आहे आणि त्याकरिता मी तुमची माफी मागतो.” राम कपूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना त्यांच्या ‘मिस्त्री’ या सीरिजच्या प्रमोशनमधून वगळण्यात आलं. राम कपूर यांनी त्यांच्या ‘मिस्त्री’ या सीरिजच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमधून हे वक्तव्य केलं होतं.
‘मिड डे’च्या वृत्तानुसार त्यांनी म्हटलं होतं की, “जर तुझ्या आईने त्यावेळी तिचं डोकं दुखत आहे असं सांगितलं असतं तर तुझा जन्मच झाला नसता.” यासह त्यांनी कामाच्या तणावाची तुलना सामूहिक बलात्काराशीही केली होती. यामुळे राम कपूर यांना अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. चुकीच्या वक्तव्यानंतर वाढलेल्या रोषामुळे राम कपूर यांनी माफी मागितली. “माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, सगळे विनोद करत असतानाच मी हे गंमत म्हणून म्हटलं होतं; पण जर ते चुकीचं आहे असं वाटत असेल तर मी माफी मागतो”, असं म्हणत त्यांनी माफी मागितली.
‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार राम कपूर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ‘जियो हॉटस्टार’ने “राम कपूरने केलेल्या वक्तव्याला आम्ही दुजोरा देत नाही, अशा प्रकारच्या विचारांना आम्ही पाठिंबा देत नाही, त्यामुळे राम कपूर पुढे या सीरिजचं प्रमोशन करणार नाही,” अशी प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांना प्रमोशनमधून वगळण्याचा निर्णयही घेतला. दरम्यान, ‘मिस्त्री’ या सीरिजमध्ये राम कपूर आणि अभिनेत्री मोना सिंह महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत. ही सीरिज ‘जियो हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २७ जून रोजी प्रदर्शित झाली आहे.