Suvrat Joshi and Sakhi Gokhale: अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले हे सध्या त्यांच्या ‘वरवरचे वधूवर’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या नाटकाची मोठी चर्चा असून, दिग्दर्शनासह कलाकारांच्या अभिनयाचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. या नाटकाचे दिग्दर्शन विराजस कुलकर्णीने केले आहे.
सुव्रत व सखी हे पहिल्यांदा ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. २०१५ साली हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेत सुव्रतने सुजय ही भूमिका साकारली होती. तर सखीने रेश्मा ही भूमिका साकारली होती.
या मालिकेतील सुजय, रेश्मा यांच्यासह अॅना, आशू, मीनल, कैवल्य ही पात्रे मोठ्या प्रमाणात गाजली होती. ही अनोळखी सहा जण एकमेकांना भेटतात. गरजेपोटी एकत्र राहायला सुरुवात करतात आणि त्यांच्यात हळूहळू मैत्री होते. ती मैत्री इतकी घट्ट होते की, एकमेकांच्या खासगी आयुष्यातील संकटांनादेखील ते एकत्र सामोरे जातात. मैत्रीवर आधारित असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.
“बायकांना त्रास देणं म्हणजे….”
सुव्रत व सखी या मालिकेच्या निमित्ताने भेटले. त्यांच्यात मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्यातील बॉण्ड घट्ट कधी झाला, याबद्दल या जोडप्याने खुलासा केला आहे.
या जोडप्याने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बरेच महिने एकत्र शूटिंग करताना असा एखादा प्रसंग असतो, ज्यामुळे बॉण्डिंग घट्ट होते. सीन अजून छान व्हायला लागतात. तुमच्याबाबत असा कोणता प्रसंग होता? त्याबद्दल सुव्रत म्हणाला, “तो थोडा अनकन्फर्टेबल असा प्रसंग आहे. आम्ही त्याबद्दल असं सार्वजनिक व्यासपीठावर कधी बोललो नाही.”
पुढे तो म्हणाला, “एकदा आम्ही सगळ्यांना गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्ये भेटायचं ठरवलं. त्या मॉलच्या मागे सखीला खूप वाईट अनुभव आला. एका पुरुषानं तिच्यावर काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. दुरूनच; पण काहीतरी प्रयत्न केला. दुर्दैवानं आपल्या समाजात किंवा जगभरातच काही पुरुष असं असतात की, त्यांना कळत नाही की आपण काय वागतोय. बायकांना त्रास देणं म्हणजेच पुरुषत्व, असं त्यांना वाटतं.
“तर सखीला खूप वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं. तिला धक्का बसला होता. पण, त्या प्रसंगामध्ये तिला पहिल्यांदा कोणाला फोन करावासा वाटला? कारण- आम्ही सगळेच तिथे होतो. तर तिनं पहिल्यांदा मला फोन केला. त्यानंतर मी मॉलच्या खाली गेलो.”
“तोपर्यंत आमची मैत्री झाली होती. एकमेकांना आवडायला लागलो आहे, असं लक्षात आलं होतं. पण कोणी व्यक्त केलं नव्हतं. त्यावेळी तिनं पहिला फोन मला लावला. मला येऊन मिठी मारली. त्यानंतर काय प्रसंग घडला हे सांगितलं. अशा कठीण प्रसंगात तिला पहिला फोन मला करावासा वाटला आणि कदाचित माझ्याजवळ आल्यानंतर तिला सुरक्षित वाटलं, ही भावना मला चांगली वाटली.”
अभिनेता असेही म्हणाला, “बऱ्याचदा आपल्या जोडीदाराला, बायकोला, प्रेयसीला आपला धाक वाटावा आणि म्हणजेच आपलं त्यांच्यावर प्रेम आहे किंवा हक्क आहे, असा एक गैरसमज अनेक पुरुषांच्या मनात असतो, जो मला अजिबात बरोबर वाटत नाही. आपल्या जोडीदाराबरोबर आपल्याला प्रत्येक क्षणी १०० टक्के सुरक्षित वाटलं पाहिजे.
“ती सुरक्षिततेची भावना की, मी कुठल्याही प्रसंगात त्याचा हात धरू शकते किंवा त्याला मिठी मारू शकते किंवा त्याच्याशी दोन शब्द बोलू शकते, हा विश्वास तिनं माझ्यावर दाखवला. तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. तिनं दाखवलेल्या विश्वासामुळे मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली. मला असं वाटतं की, त्यावेळी पहिल्यांदा मला वाटलं की, सखी व माझ्यातील नातं हे मैत्रीपेक्षा जरा पुढे खोल आहे.”
दरम्यान, सखी व सुव्रत काम करीत असलेल्या ‘वरवरचे वधूवर’ नाटकाला अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.