‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा भारतातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. १७ वर्षांच्या या प्रवासात अनेक कलाकारांनी मालिका सोडली, त्यांची जागा नवीन कलाकारांनी घेतली. पण दयाबेन हे पात्र साकारणाऱ्या दिशा वकानीची रिप्लेसमेंट निर्मात्यांनी अद्याप आणली नाही. दिशा वकानीने ही मालिका सोडून ८ वर्षे झाली आहेत. दिशा मालिकेत परतणार की नाही अशा चर्चा वारंवार होत असतात. या मालिकेत सुंदरलाल हे पात्र साकारणारा अभिनेता मयुर वकानी हा दिशाचा खऱ्या आयुष्यातील सख्खा भाऊ आहे. मयुरनेच दिशाच्या कमबॅकच्या चर्चांबद्दल खरं काय ते सांगितलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मयुरने सांगितलं की दिशा सध्या खऱ्या आयुष्यात आईची भूमिका साकारण्यात व्यग्र आहे. मयुर दिशापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. त्याने दिशाचा प्रवास जवळून पाहिला आहे. तो म्हणतो जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने काम केले, तर देवाचे आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर असतात. दिशाने मालिका करताना कठोर परिश्रम केले, म्हणून लोक तिच्यावर खूप प्रेम करतात.
आयुष्यात मिळेल ती भूमिका प्रामाणिकपणे करावी, असा सल्ला मयुर व दिशाला वडिलांनी दिला होता. दोघेही त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतात. सध्या, दिशा खऱ्या आयुष्यात आईची भूमिका साकारत आहे आणि ती पूर्ण समर्पणाने ती तिची भूमिका पार पाडतेय, असं मयुरने नमूद केलं.
मयुरला लोक अनेकदा विचारतात, ‘दया कधी येईल? दिशा कधी परत येईल?’ मयुर म्हणाला, “जेव्हा मी माझ्या बहिणीला खऱ्या आयुष्यात भेटतो, तेव्हा भाऊ म्हणून भेटतो. पण जेव्हा अभिनय आणि पडद्यावर प्रेम दाखवायचं असतं तेव्हा मी कधीही मर्यादा ओलांडत नाही. मी नेहमीच दोन्ही नात्यांचा आदर करतो.”
मयुरने बहिणीच्या कामाचे कौतुक केले. दिशा कॅमेऱ्यासमोर असते तेव्हा खूप शांत असते, पण स्टेजवर किंवा कॅमेऱ्यासमोर आल्यावर तिच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते. तिच्याइतका दमदार अभिनय आपण करू शकत नसल्याची प्रांजळ कबुली मयुर देतो.
दरम्यान, मयुर वकानी तारक मेहता मालिकेत सुंदरची भूमिका करतोय. त्याचबरोबर तो गुजराती मालिका व सिनेमे करतो. पण दिशा वकानीने मुलीच्या जन्मानंतर अभिनयातून ब्रेक घेतला. तिला एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. सध्या ती संसारात रमली असून मुलांचा सांभाळ करतेय.