छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. कित्येक प्रेक्षक असे आहेत जे आजही ही मालिका केवळ जेठालाल या पात्रासाठी बघतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकतंच ‘द बॉम्बे जर्नी’ या यूट्यूबवरील कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली आणि त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल बरीच माहिती सांगितली. दिलीप जोशी यांनी या मुलाखतीमध्ये भरपूर गप्पा मारल्या. इतकंच नव्हे तर ‘हम आपके है कौन’ चित्रपटातील एका छोट्या भूमिकेनंतर त्यांच्या आयुष्यात घडलेल्या बदलांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. शिवाय हा चित्रपट जेव्हा त्यांच्याकडे आलेला तेव्हा त्यांना पैशांची फार गरज होती.

आणखी वाचा : जॉनी डेप करणार ‘Modi’ या बायोपिकचे दिग्दर्शन; ‘हा’ हॉलिवूड अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

याबद्दल बोलताना दिलीप जोशी म्हणाले, “१९९२ साली माझी मुलगी नियतीचा जन्म झाला. त्यावेळी माझ्या बँक खात्यात केवळ २५००० रुपये होते, त्यापैकी १३ ते १५ हजार हे हॉस्पिटलचे बील देण्यात गेले. त्यावेळी मी फक्त नाटक करत होतो ज्यासाठी मला प्रत्येक शोमागे ४०० ते ४५० रुपये मिळायचे. त्यावेळी मला ‘हम आपके है कौन’सारखा चित्रपट मिळाला अन् मला वाटलं बास आता माझा स्ट्रगल संपला, पण घडलं उलटच. तो चित्रपट प्रदर्शित झाला, सुपरहीट झाला पण त्यानंतर मला काम मिळायचं बंद झालं.”

सलमानच्या ‘मैंने प्यार कीया’मधूनच दिलीप जोशी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दिलीप यांनी बऱ्याच चित्रपटात काम केलं, पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. नाटकात एकेकाळी बॅकस्टेजचं काम करणारे दिलीप जोशी एका एपिसोडसाठी तब्बल दीड लाख रुपये मानधन घेतात. मालिका विश्वात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये दिलीप जोशी टॉपला आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarak mehta ka ooltah chashma fame dilip joshi share experience of working in hum aapke hai kaun avn