Why Terence Lewis not Married: टीव्हीवर आतापर्यंत अनेक लोकप्रिय डान्स रिअॅलिटी आले. यापैकी बऱ्याच शोमध्ये कोरिओग्राफर टेरेन्स लुईसने परीक्षक म्हणून काम केलं. टेरेन्स लुईस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आहे. टेरेन्स लुईस ५० वर्षांचा आहे, पण त्याने लग्न केलेलं नाही. आता एका मुलाखतीत टेरेन्सने लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे.
टेरेन्स लुईस आपल्या स्पष्टवक्त्या स्वभावासाठी ओळखला जातो. आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत टेरेन्स म्हणाला की त्याच्या आयुष्यात लग्नाची ‘एक्सपायरी डेट’ निघून गेली आहे. आता तो लग्नाचा विचारही करू शकत नाही. अविवाहित राहून खूप आनंदी आहे आणि लग्न करून गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या करण्याची गरज वाटत नाही, असं मत टेरेन्सने व्यक्त केलं.
लग्नाबद्दल टेरेन्स लुईस म्हणाला…
टेरेन्स लुईसला त्याच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल विचारण्यात आलं. तो विनोदाने म्हणाला की आता तो स्वतःच्या अनुभवातून शिकला आहे, त्यामुळे दुसऱ्याचे आयुष्य कठीण करण्यात काही अर्थ नाही. “लग्न ही गोष्ट माझ्याकडून तरी आता होणार नाही. आता माझ्या लग्नाची एक्सपायरी डेट उलटून गेली आहे. मी आता लग्नाच्या शेल्फमधून बाहेर पडलो आहे. मी अविवाहित राहून खूप आनंदी आहे. त्यामुळे मला वाटतं की आता कोणाचं आयुष्य का बरबाद का करावं? मी माझं स्वतःचं आयुष्य आधीच बरबाद केलं आहे. त्यामुळे एक दुःखी व्यक्ती दोनपेक्षा कधीही चांगली,” असं टेरेन्स लुईस म्हणाला.
टेरेन्सच्या रॅम्प वॉकने वेधले लक्ष
टेरेन्सने नुकतंच डिझायनर्स विशाल आणि सोना थवानी यांच्यासाठी शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. कोरिओग्राफर टेरेन्स लुईसने नवरदेवाच्या पोशाखात रॅम्प वॉक करून चाहत्यांचे लक्ष वेधले. हा वॉक केवळ फॅशनबद्दल नव्हता तर नवरदेवाच्या भावना आणि सौंदर्य दर्शवण्यासाठी देखील होता.
टेरेन्स लुईसने ‘लगान’, ‘झनक बीट्स’ आणि ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ सारख्या बॉलीवूड चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. त्याने अनेक स्टेज शोचे नृत्यदिग्दर्शनही केले आहे. टेरेन्सने कंटेम्प्ररी डान्स परफॉर्मन्स, कॉर्पोरेट कार्यक्रम, ब्रॉडवे आणि वेस्ट-एंड म्युझिक ड्रामा तसेच म्युझिक व्हिडीओसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
टेरेन्स लुईस ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ३’ मध्ये स्पर्धक होता. २०२३ मध्ये तो ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन ३’ मध्ये परिक्षक म्हणून दिसला होता. टेरेन्सने ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन ४’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही परिक्षक म्हणून काम केलंय.