अनेकदा चित्रपट किंवा मालिकांमधून खलनायक किंवा खलनायिका साकारणारे कलाकार हे खऱ्या आयुष्यातही तसेच असावेत असा समज प्रेक्षकांचा असतो. पडद्यावर नकारात्मक भूमिका करणाऱ्या कलाकारांना कायमच प्रेक्षकांकडूनही नकारात्मकच प्रतिक्रिया मिळत असतात; ही त्या कलाकारांसाठी त्यांच्या कामाची पोचपावती असते. पण नकारात्मक किंवा खलनायकी भूमिका करणारे कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात फारच प्रेमळ असतात आणि याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे.
मालिकांमध्ये खलनायकी भूमिका करणारे कलाकार हे प्रत्यक्षात चांगले असल्याचे त्यांचे सहकलाकार अनेकदा सांगतात. असंच ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील प्रिया या खलनायिकेचं अर्जुनने कौतुक केलं आहे. स्टार प्रवाहवर वटपौर्णिमानिमित्त खास भाग पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने ‘ठरलं तर मग’मधील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने प्रिया/तन्वी म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरचं कौतुक केलं.
‘स्टार मीडिया मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अमित प्रियांकाचं कौतुक करत म्हणाला, “माझा तसा हिच्यावर वैयक्तिक राग वगैरे नाही. ती जरी स्क्रीनवर किंवा मालिकेत खलनायिका म्हणून काम करत असेल तरी व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. याचनिमित्ताने एक गोष्ट सांगेन की, मध्ये माझी तब्येत बरी नव्हती. मी आजारी होतो; तेव्हा तिने मला विचारलं होतं. त्यानंतर माझी आई हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हाही तिने विचारपूस केली होती.”
यापुढे अमित म्हणाला, “प्रिया माणूस म्हणून खूप छान आहे. खलनायिकेचं काम करते म्हणून थोबडवावंसं वाटतं; पण ती खऱ्या आयुष्यात तशी नाही, ती खूप चांगली मुलगी आहे.” यानंतर प्रिया म्हणाली, “आपण जेव्हा एकत्र काम करत असतो तेव्हा आपल्याला व्यक्तीबद्दलच्या काही गोष्टी कळतात. मी अमितला या दोन वर्षात जितकं पाहिलं आहे, त्यावरून अमितसाठी त्याची आई, पत्नी आणि त्याचा मुलगा हे प्रथम येतं.”
यापुढे ती अमितचं कौतुक करत म्हणाली, “काम तर आहेच, तो काम प्रामाणिकपणे करतोच. पण त्याच्या आईची त्याला किती काळजी आहे आणि तो ती कशी घेतो हे आम्ही पाहतो. त्यामुळे तिला बरं नसणं आणि त्याच्या चेहऱ्यावर ते लगेच दिसतं. यापुढे जाऊन मला असं वाटतं की, दिवसभरातले १३-१३ तास जेव्हा तुम्ही एकत्र काम करत असता तेव्हा तुमचं एक कुटुंब तयार होतं.
यानंतर तिने सांगितलं, “आपण जर एकमेकांची काळजी घेतली नाही तर एकत्र काम करण्याची काय मजा? काय आठवण राहणार. पुढे जाऊन ही मालिका संपेल तेव्हा याच आठवणी राहतील की, अमित एक असा मुलगा आहे ज्याला आईची इतकी काळजी आहे. बायकोविषयी प्रेम आहे, मुलाचा लळा आहे. तर मला वाटतं याच काही खास आठवणी आहेत, ज्या पुढे जाऊन आयुष्यभर सोबत राहतात.”