सध्या मनोरंजनसृष्टीत लगीनघाई सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी कलाकारांनी लग्न करीत नवीन आयुष्याला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपूर्वीच मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे लग्नबंधनात अडकली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्नगाठ बांधली. नातेवाईक व जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

तितीक्षा व सिद्धार्थ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. तितीक्षा व सिद्धार्थने साखरपुड्यापासून सप्तपदीपर्यंत लग्नातील प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. लग्नात दोघांच्या पारंपरिक लूकने चाहत्यांची मने जिंकली होती. दरम्यान, त्यांचा नवा व्हिडीओ सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा- थाटात एन्ट्री, सातफेरे अन्…; ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हार-अंतराने खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ, घेतले हटके उखाणे

तितीक्षा व सिद्धार्थ यांनी त्यांच्या संगीत सोहळ्यामधील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये नवरा-नवरीबरोबर त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. या संगीत सोहळ्याला मराठीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी तितीक्षा व सिद्धार्थच्या डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. एवढेच नाही, तर तितीक्षाची बहीण खुशबू तावडे व तिचा नवरा अभिनेता संग्राम यांनीसुद्धा जबरदस्त डान्स केला.

तितीक्षा व सिद्धार्थच्या संगीत सोहळ्यात अभिनेत्री रसिका सुनील तिच्या पतीसह सहभागी झाली होती. गौरी नलावडे, अनघा अतुल यांसारख्या अभिनेत्रींनीसुद्धा या संगीत सोहळ्यात ठेका धरला. कलाकारांबरोबर नवरा-नवरीचे कुटुंबीयांनीही या लग्नात ठेका धरलेला पाहायला मिळाला.