Tu Hi Re Maza Mitwa Promo : स्टार प्रवाहची ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना आवडत आहेत. मालिकेतील अर्णव-ईश्वरीची जोडी प्रेक्षकांची तर लोकप्रिय जोडी आहे. अर्णव-ईश्वरी यांच्यातील मैत्रीनंतर दोघांची लव्हस्टोरीसुद्धा सुरू होणार होती, पण इथेच मोठा ट्विस्ट आला आणि दोघे एकमेकांपासून काहीसे दूर झाले.

अर्णवचे जिजू (राजेश) हा राकेश म्हणून ईश्वरीची फसवणूक करून लग्न करणार आहे. ईश्वसह तिच्या घरच्यांना त्याने आपल्या जाळ्यात ओढलं आहे. काही दिवसांपूर्वी राकेशने अर्णवचा बदला घेण्यासाठी ईश्वरीच्या वडिलांचा अपघात केला. या अपघातासाठी त्याने अर्णवच्या गाडीचा वापर केला. त्यामुळे या अपघातप्रकरणी अर्णववर संशय आला.

अशातच मालिकेत आता अर्णव आणि लावण्या यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली असून नुकत्याच (मंगळवार) झालेल्या भागात अर्णव-लावण्या यांचा हळदी सोहळा पार पडत होता. मात्र या हळदी समारंभातून अर्णव ईश्वरीच्या काळजी पोटी मध्येच उठून गेला.

राकेशने ईश्वरीला कुलदैवतेचे दर्शन घेण्यासाठी म्हणून एका अज्ञात ठिकाणी नेले आहे आणि तिथे जाऊन तो तिची फसवणूक करणार आहे. मात्र या संकटात अर्णव ईश्वरीच्या मदतीला धावून गेला आहे. मालिकेच्या आगामी कथानकातील नव्या ट्विस्टचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात अर्णव ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारणार आहे.

नुकत्याच झालेल्या भागात अर्णव आजारपणाचं नाटक करीत ईश्वरीला एका चुकीच्या ठिकाणी घेऊन जातो. नंतर या ठिकाणी पोलिसांची रेड पडते. यात ईश्वरीची बदनामी होऊ नये आणि ती यात अडकू नये, म्हणून अर्णव ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि पोलिसांना ईश्वरी ही त्याची पत्नी असल्याचं सांगतो.

एकीकडे अर्णवचं लावण्याशी लग्न ठरलेलं असतानाच तो आता ईश्वरीला आपली पत्नी म्हणून स्वीकारणार आहे. त्यामुळे आता अर्णव-ईश्वरीचं लग्न झाल्यानंतर मालिकेत पुढच्या भागात काय होणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.