Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका चांगलीच गाजली. झी मराठी वाहिनीवर २०२३ ला ही मालिका प्रदर्शित झाली होती. जवळजवळ दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने २०२५ मध्ये निरोप घेतला. मालिका संपल्यानंतर अनेक चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले होते.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका कुठे व कधी पाहता येणार?
आता मात्र चाहत्यांना ही मालिका पुन्हा एकदा पाहता येणार आहे. मास्तरीण बाई आणि अधिपतीची ही लोकप्रिय जोडी कधी व कुठे पाहायला मिळणार, हे जाणून घेऊ…
झी चित्रमंदिर या वाहिनीवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रदर्शित होणार आहे. ६ ऑक्टोबर २०२५ पासून ही मालिका प्रदर्शित होणार आहे. दररोज संध्याकाळी ७.३० वाजता ही मालिका पाहता येणार आहे.
या मालिकेतील अक्षरा आणि अधिपती यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. उच्चशिक्षित व शिक्षिका असलेली अक्षरा आणि अशिक्षित अधिपती हे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असल्याचे पाहायला मिळाले. त्याबरोबरच मालिकेतील भुवनेश्वरी या पात्राचीदेखील मोठी चर्चा झाली. भुवनेश्वरी व अक्षरा यांच्यातील वादविवादामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. चारुहास, दुर्गेश्वरी या पात्रांनादेखील प्रेक्षकांकडून दाद मिळाली.
या मालिकेत अक्षराच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे दिसली होती. अभिनेता हृषिकेश शेलार अधिपती या भूमिकेत दिसला होता. कविता मेढेकर यांनी भुवनेश्वरी ही भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. गेली अनेक वर्षे नायिकेच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्रीने खलनायिकेची भूमिका साकारल्याने मोठी चर्चा झाली होती. स्वप्नील राजशेखर यांनी चारुहास ही भूमिका साकारली होती.
ही मालिका संपल्यानंतर कलाकार विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळते. शिवानी रांगोळे सध्या ‘कोहम’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियावरदेखील हे कलाकार सक्रिय असतात. त्यांच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्याबाबतदेखील ते वक्तव्य करत असतात.