मनोरंजनाच्या साधनात काळानुरुप बदल होत आले आहेत. लोककला, नृत्य, नाटक अशा माध्यमांतून पूर्वी लोकांचे मनोरंजन होत असे. चित्रपट, टीव्ही मालिका ते आता काही काळापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वेब सीरिज अशा माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. मनोरंजनाच्या साधनात बदल होत असले तरी टीव्हीवरील मालिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसते. टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक भाग बनतात. मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. आता झी मराठी वाहिनीवर काही मालिकांमध्ये मोठे ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालिकांमध्ये येणार मोठा ट्विस्ट

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सुरुवातीला ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील काही भाग पाहायला मिळत आहे. तिलोत्तमा सावलीला कोणत्यातरी कारणावरून कानाखाली मारणार तितक्यात सारंग तिला तसे करण्यापासून थांबवतो. हे पाहून तिलोत्तमाला धक्का बसतो. पुढे सावली विठ्ठलाच्या पाया पडते व म्हणते की, मला आता काहीही झालं तरी मला या घरासाठी उभं राहावं लागणार. कारण आता सारंग सर माझ्याबरोबर आहेत.

याच प्रोमोमध्ये पुढे शिवाच्या मालिकेत पुढे काय घडणार ते पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवा व आशूमध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले होते. नेहा व आशू घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न करत होते. आता मात्र शिवाचा आशूविषयीचा विश्वास खरा ठरल्याचे दिसत आहे. आशू व नेहाच्या लग्नाच्या मंडपात सगळे उपस्थित असल्याचे दिसत आहेत. तिथे शिवासुद्धा आहे. आशूच्या हातात काही कागद असून तो ते फाडत असल्याचे दिसत आहे. ते पाहून रामभाऊ त्याला विचारतात, “आशू अरे हे काय आहे? ” त्यावर आशू म्हणतो, “हे माझे आणि शिवाचे डिव्होर्स पेपर आहेत.” त्याची आई म्हणजेच सिताई त्याला विचारते, “आशू हे काय करतोयस?” त्यावर आशू म्हणतो, “हे खूप आधी करायला हवं होतं. उशिरा का असेना मी केलेली चूक आज सुधारतोय.” प्रोमोच्या शेवटी तुळजा व सूर्या एकत्र येतात. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तुळजा म्हणते की, मी आमच्या कुटुंबाला आदर्श कुटुंब बनवण्याचा निर्धार केला आहे.

हा प्रोमो शेअर करताना, “गुंता सुटणार, नाती आणखी जवळ येणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

या प्रोमोमध्ये ‘सावळ्याची जणू सावली’, ‘लाखात एक आमचा दादा’ व ‘शिवा’ या लोकप्रिय मालिकांचे २ फेब्रुवारीला महाएपिसोड असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकेत नेमकं काय होणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’मधील सारंग व सावली यांचे त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झाले आहे. सारंगच्या घरातील बहुतांश सदस्यांना सावली आवडत नाही. आता सारंगचे मात्र तिच्याविषयीचे मत बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘शिवा’ मालिकेत आशूच्या मनात शिवाविषयी मोठे गैरसमज निर्माण झाले होते. या सगळ्यातून त्यांनी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या होत्या. आशूने नेहाबरोबरच्या लग्नाला होकार दिला होता. त्यांचे लग्न होत असतानाच आता मात्र मालिकेत ट्विस्ट येणार असल्याचे दिसत आहे. तर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सूर्याच्या गावात आदर्श कुटुंब स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सूर्याचे व डॅडींचे कुटुंब सहभागी होणार आहे. आता कोणाचे कुटुंब आदर्श ठरणार आणि ही स्पर्धा जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twist in shiva lakhat ek aamcha dada savalyachi janu savali upcoming episode new promo marathi serial watch nsp